इटली, अमेरिका, स्पेनमधील करोनामध्ये मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षात घेता राज्यातील जनतेने बोध घेऊन आतातरी शहाणे व्हावे. भाजी व अन्य खरेदीसाठी रस्त्यावरील गर्दी बंद करावी. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढय़ात योगदान द्यावे, असे आवाहन करतानाच ‘कोरोना’विरुद्धच्या लढय़ात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी राज्यातील जनतेला दिला.

राज्यातील करोना  बाधितांची संख्या चिंताजनक आहे. या पाश्र्वभूमीवर भाजी व अन्य वस्तूंच्या खरेदीसाठी  बाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर ‘टाळाबंदी’चा उद्देशच धोक्यात आला आहे. जनतेने घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणे सुरुच ठेवले तर सद्यस्थितीचा पुनर्विचार करुन कठोर उपाय योजावे लागतील, असा इशाराही पवार यांनी दिला आहे. बेजबाबदारपणानं वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे करोनाविरुद्धच्या लढय़ाला धक्का बसत आहे.  मात्र हा बेजबाबदारपणा आता सहन केला जाणार नाही. करोना विरुद्धचा लढा जिंकायचा असेल तर बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला.

जीवाची जोखीम पत्करुन  करोनाच्या विरोधात लढा देणाऱ्या  डॉक्टर्स, निम वैद्यकीय कर्मचारी, पोलिस, सफाई कामगार, या सर्वांच्या त्यागाचा जनतेने सन्मान करावा.  करोनाच्या संकटाविरुद्ध राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग, पोलिस विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महसुल विभाग, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासनाची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. राज्यातील बहुतांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढय़ात योगदान देत आहेत. याचप्रमाणे सर्वच लोकांनी घरातच बसून या लढय़ात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.