मासे खायचे असतील तर मालवणी पद्धतीचेच, अशी अनेकांची अट असते. ओल्या नारळाचा वापर करून माशाची डोकी टाकून तयार केलेलं कालवण आणि तव्यावर तळलेला कुठलाही मासा मन तृप्त करायला आणि पोट भरायला पुरेसा असतो. पण गोडय़ा पाण्यातील मासेदेखील विशिष्ट पद्धतीने बनवले तर त्याची चवही मालवणी जेवणाला टक्कर देऊ  शकते. बंगाली पद्धतीने तयार केलेले मासे हे त्याचं उत्तम उदाहरण. पण तुम्ही कधी पंजाबी पद्धतीचे मासे खाल्ले आहेत का? खरंतर पंजाबी पद्धतीचे हे ऐकायलाच खटकतं ना? परंतु खार पश्चिमेला असलेल्या ‘जय जवान’ या छोटेखानी रेस्टॉरंटमध्ये माशाला दिलेला पंजाबी तडका अफलातून आहे. १९७५ पासून मुंबईकर त्याचा आस्वाद घेत आहेत. अगदी पाठ करता येईल असा साधा आणि छोटा मेन्यू आहे. व्हेज-नॉनव्हेज, स्टार्टर, मेन कोर्स, राईस आणि रोटी इतकेच कप्पे त्यामध्ये आहेत.

‘जय जवान’चं पंजाबी फिश फ्राय, पंजाबी कोलंबी फ्राय, पापलेट तंदूरी आणि पंजाबी कोलंबी मसाला विशेष प्रसिद्ध आहे. फिश फ्रायसाठी गोडय़ा पाण्यातील ‘बासा’ हा मासा वापरला जातो आणि तोसुद्धा सुप्रिम क्वॉलिटीचा. मासा खाताना ते तुम्हाला लक्षात येईलच. ‘जय जवान’चे मालक नंदी यांनी खास मेहनत घेऊन माशांसाठीचा मसाला तयार करून घेतला आहे. ज्याचा एक थर माशांवर चढवून त्याला बेसनच्या पिठात हलकेच बुडवून माशाची तुकडी डिप फ्राय करण्यासाठी तेलात सोडली जाते. शेंगदाण्याचं अतिशय चांगल्या दर्जाचं तेल तळण्यासाठी वापरलं जात असल्याने तुमच्या टेबलावर जेव्हा पंजाबी फिश फ्राय येतो तेव्हा त्यावर तेलाचा लवलेशही दिसत नाही किंवा ताटामध्ये तेल उतरलेलं नसतं. फ्रायसाठी वापरल्या जाणाऱ्या कोलंब्याही आकाराला चांगल्या मोठय़ा असतात. मसाला आणि बेसनाचा अतिशय पातळ थर असल्याने आतला मासाही छान भाजलेला असतो. या माशाची चव वेगळी का लागते याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तर कळलं की, इथल्या मसाल्यामध्ये लसूण पाणी टाकलं जातं आणि त्या पाण्यावरच चवीचा संपूर्ण खेळ अवलंबून आहे. हा प्रकार नुसताच खायला चवदार लागत असला तरी सर्वच टेबलांवर सुरुवातीला आणून ठेवल्या जाणाऱ्या हिरव्या चटणीसोबत खा. पालक, पुदीना, खजूर, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण यांच्या मिश्रणातून तयार झालेली अतिशय बारीक वाटलेली ही चटणी चवीला अजिबत तिखट नाही पण थोडी आंबट आहे. अनेक जण तर मुख्य जेवण येईपर्यंत ती सोबतच्या कांद्यासोबतच खात असतात. यावरूनच तिची ख्याती लक्षात येईल.

पंजाबी म्हटल्यावर चिकन पाहिजेच. त्यामुळे माशांसोबतच इथले चिकनचे पदार्थही लाजवाब आहेत. तंदूरी चिकन आणि चिकन तिक्कामध्ये मलाई, रेशमी, बंजारा असे तीन प्रकार मिळतात. चिकन लिव्हर, चिकन आणि मटण शीग कबाबही आवर्जून खाण्यासारखे आहेत. मेन कोर्समध्ये इथलं बटर चिकन सर्वात लोकप्रिय आहे. कारण इतर ठिकाणी बटर चिकन गोड असतं पण इथलं बटर चिकन थोडं तिखट आणि आंबट लागतं. पण त्यामध्ये असलेल्या क्रीममुळे तो आंबटपणा कुठेच वरचढ ठरत नाही किंवा नंतर त्रासही देत नाही. इतर कुठल्याही पिठाची भेसळ न केलेल्या फक्त गव्हाच्या पिठाच्या गरमागरम आणि मऊ  रोटीसोबत बटर चिकन खाण्याची मजा शब्दात व्यक्त करता येणार नाही.

नॉनव्हेज इथली खासियत असली तरी व्हेज खाणाऱ्यांनीही इथे आवर्जून जावं. त्यांच्यासाठी मेन्यूमध्ये अगदीच मोजके पदार्थ असले तरीही ते पदार्थ मन खूश करून जातात. विशेष म्हणजे मसूर आणि राजमा यांच्या मिश्रणातून तयार झालेली दाल मखनी बराच काळ मंद आचेवर शिजवत ठेवलेली असते. त्यामुळे ‘जय जवान’चा विशेष मसाला त्यामध्ये चांगलाच मुरतो. पनीर मखनी, पनीर मिक्स व्हेज, पनीर भुर्जी, तवा मसाला हे व्हेजमध्ये आणखी काही पर्याय आहेत. चिकन, चिकन तिक्का, कोलंबी, व्हेजिटेबल बिर्याणी हे पर्याय राईसमध्ये आहेत.

इतर नॉनव्हेज रेस्टॉरंटमध्ये पदार्थाच्या ज्या किमती असतात त्याच्याशी मिळत्याजुळत्याच इथल्या पदार्थाच्या किमती असल्या तरी क्वाँटिटी आणि क्वॉलिटीच्या बाबतीत ‘जय जवान’ नक्कीच उजवं ठरतं. गटारीच्या सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे थोडय़ा वेगळ्या तडक्याचे पदार्थ खायचे असतील तर हा पंजाबी तडका उत्तम पर्याय ठरू शकतो.

जय जवान

  • कुठे- शॉप नं. ७, १४ क्रॉस रोड जंक्शन, पी. डी. हिंदुजा मार्ग, लिंकिंग रोड, खार रोड (पश्चिम), मुंबई</li>
  • कधी- सोमवार ते रविवार सायंकाळी ६.३० ते रात्री १२ वाजेपर्यंत

nanawareprashant@gmail.com

@nprashant