भाजपच्या मित्रपक्षाच्या गोटात आणखी एका पक्ष सहभागी झाला आहे. कोल्हापूर येथील माजी मंत्री विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष महायुतीत सामील झाला आहे. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नाने जनसुराज्य पक्ष महायुतीत सहभागी झाल्याचे बोलले जाते. कोल्हापूर, सांगली, सोलापूर या तीन जिल्ह्यांत होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत विनय कोरे यांचा जनसुराज्यशक्ती पक्ष भाजपाशी आघाडी करणार आहे. महायुतीत पाच पक्ष असून या निमित्ताने आणखी एक नवा मित्र भाजपाशी जोडला जाणार असून यामुळे भाजपा व जनसुराज्यशक्ती या दोन्ही पक्षांना पश्चिम महाराष्ट्रात पक्ष विस्ताराची आणखी संधी मिळणार आहे.

विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. कोणत्याही अटींशिवाय आपला पक्ष महायुतीत सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच साखर जीवनावश्यक वस्तूमधून वगळण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली. ७८ टक्के साखर ही उद्योगांमध्ये वापरली जाते. त्यामुळे याचा फायदा सर्वसामान्यांना होत नसल्याचे सांगत साखर जीवनावश्यक वस्तूतून वगळण्यात यावे असे म्हटले. कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोल्हापुरातून खासदार संभाजीराजे, शाहू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजीतसिंग घाटगे या मातबरांनंतर भाजपच्या संपर्कात जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे आले आहेत. विनय कोरे यांनी यापूर्वी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात अपारंपरिक ऊर्जामंत्री पद भुषवले होते. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यात जनसुराज्य पक्षाचे थोडेफार अस्तित्व आहे. यापूर्वी सोलापूर महानगरपालिकेत या पक्षाचे चार नगरसेवक होते.
विनय कोरे यांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभेत प्रवेश केला होता. त्यानंतर २००४ मध्ये त्यांनी जनसुराज्य शक्ती या पक्षाची स्थापना केली. पहिल्याच निवडणुकीत या पक्षाने कोल्हापूर जिल्ह्यात तीन व अमरावतीत एक असे चार आमदार निवडून आले होते. कोल्हापुरातून विनय कोरेंसह राजू आवळे (वडगाव) व नरसिंगराव पाटील (चंदगड) आणि हर्षवर्धन देशमुख हे ते चार आमदार होते. या बळावर विनय कोरेंनी कॅबिनेट मंत्रीपदही भूषविले. त्यानंतर त्यांचे राष्ट्रवादीबरोबरच संबंध तितकेसे चांगले राहिले नाहीत. नंतर जनसुराज्य पक्षाचीही थोडी घसरण झाली.
कोरे यांनी वारणा दूध संघाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या जीवनात मोठी आर्थिक चळवळ उभारली आहे. त्याचा फायदा जनसुराज्य पक्षाला मोठ्याप्रमाणात होतो.
दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी सांगली येथे विनय कोरे यांनी भाजपप्रणीत केंद्र सरकारवर टीका केली होती. मोदी सरकारचे साखर विषयक धोरण शीतपेये, औषध कंपन्या, बेकरी उत्पादनांसह बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हिताचे आहे. त्यात सामान्य ऊस उत्पादकांवर अन्याय होतो. सामान्य ग्राहकांच्या हिताचे उसने अवसान आणून बड्या उद्योजकांच्या तिजोऱ्या भरल्या जात आहेत, असा आरोप केला होता.