गेल्या तीन अधिवेशनांत सत्ताधारी भाजप, शिवसेनेला चिमटे

विधिमंडळात भाषणाच्या ओघात समोर बसलेले मंत्री किंवा आमदारांची अशी काही टोपी उडवायची की तो गारद झालाच पाहिजे. केशवराव धोंडगे, शरद पवार, विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, प्रमोद नवलकर आदी नेत्यांची ही परंपरा आता राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांनी पुढे सुरू ठेवली आहे.

गेल्या तीन अधिवेशनांमध्ये जयंत पाटील यांच्या भाषणांमध्ये हजरजबाबीपणा तसेच समोर बसलेल्या सदस्यांना हलकेच टपली मारण्याचा गुण बघायला मिळाला. राज्य वस्तू आणि सेवा कर मंजूर करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनातही जयंतरावांनी केलेल्या भाषणाने भाजप आणि शिवसेनेला चांगलेच घायाळ केले. भाषणाच्या ओघात एखाद्याला अशा काही टपल्या मारायच्या की, त्याला विरोध करणे शक्य होणार नाही, अशा पद्धतीने भाषणाची रचना केली जाते. जयंत पाटील यांनी वस्तू आणि सेवा कराच्या विधेयकाला शिवसेनेचा पाठिंबा मिळावा म्हणून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या ‘मातोश्री’ वाऱ्या, गाळ काढण्याचे काम बघण्यासाठी जाणारे मुख्यमंत्री, मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात पहारेकऱ्याची भूमिका बजाविण्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांचे वक्तव्य, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांना मंत्रिपद का नाकारले जात आहे, असा केलेला खोचक सवाल, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी कटप्पाने बाहुबलीला का मारले याचा संदर्भ घेऊन सभागृहात कटप्पा आणि बाहुबली कोण ही केलेली विचारणा, रामदास कदम यांच्यावर केलेले प्रहार हे सारेच गाजले.

राज्य विधिमंडळाची थोर परंपरा आहे. काही सदस्य हे अभ्यासू म्हणून प्रसिद्ध होते, तर काही आक्रमक. त्याच वेळी काही आमदारांनी आपल्या भाषणांमधून सभागृहात छाप पाडली. शेकापचे केशवराव धोंडगे तर अवलिया व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध होते. केशवराव एखाद्यावर असा काही निशाणा साधत की तो पार गारद व्हायचा. माजी मुख्यमंत्री शरद पवार हे चिमटे काढणे किंवा एखाद्याच्या मर्मावर बोट ठेवण्यासाठी प्रसिद्ध होते. शिवसेनेचे प्रमोद नवलकर हे तर प्रचंड हजरजबाबी.माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हेसुद्धा चिमटे काढण्यात प्रसिद्ध होते. गोपीनाथ मुंडे हे विरोधी पक्षनेते असताना त्यांची आणि विलासरावांची सभागृहात जुगलबंदी झाली. मुंडे यांनी त्यांच्या पद्धतीने विलासरावांना चिमटे काढले. तेव्हा मंत्री असलेल्या विलासरावांनी मग विरोधी पक्षनेते म्हणून गोपीनाथराव हे एवढे चांगले काम करतात की त्यांनी कायम या पदावर राहावे आणि मी कायम समोरच्या बाजूला असे सांगताच सभागृहात एकच खसखस पिकली होती.

गोपीनाथ मुंडे यांच्या भाषणांमध्ये जान असायची. बोलण्याच्या ओघात सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या बाकांवरील एखादा मंत्री किंवा आमदाराचे नाव घेऊन त्याच्या मर्मावर बोट ठेवायचे. आघाडी सरकारच्या काळात डॉ. पतंगराव कदम यांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागलेले असायचे. तेव्हा पतंगराव तुमचा शपथविधी कधी होणार, असा बोचरा सवाल ते करीत.

माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनासुद्धा ही कला चांगली अवगत होती. आर. आर. यांचे सार्वजनिक जीवनातील आणि विधिमंडळातील शेवटचे भाषण असेच चांगले गाजले होते. सरकार येण्यापूर्वी विनोद तावडे हे मी गृहमंत्री होणार असे सांगत. पण त्यांना शिक्षण हे खाते देण्यात आले. तरीही आपले जुने दालन त्यांनी घेतल्याने त्यांची तेवढीच इच्छा पूर्ण झाली हा तावडे यांच्या वर्मी लागणारा घाव आर. आर. आबांनी घातला होता. एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली तेव्हा शिंदेसाहेब आता पाच वर्षे या पदावर काम करून न्याय द्या, मध्येच पद सोडू नका, असा प्रेमळ सल्लाही दिला होता.

राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्याकडेही समोरच्याच्या टोप्या उडविण्याची शैली आहे. उद्धव ठाकरे आणि महादेव जानकर या दोघांनाही पंतप्रधान मोदी यांनी आयोजित केलेल्या घटक पक्षांच्या बैठकीला निमंत्रित करण्यात आले होते, असे सांगत शिवसेनेला फार काही महत्त्व नाही, असे चित्र त्यांनी रंगविले.  विधानसभेतील राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल हे इरसाल आणि गावरान व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध आहेत. एखाद्याची अशी काही टोपी उडवितात की समोरचा पार गोंधळून जातो. मागील विधानसभेत शिवसेनेचे एक आमदार मद्याच्या अमलाखाली बोलत होते. तेव्हा शिवसेनेच्या काही ज्येष्ठ आमदारांनी या आमदाराला गप्प करण्याचा प्रयत्न केला असता सोपल यांनी बोलू द्या त्यांना. आता ते खरे बोलतील, असे सांगताच सभागृहात हास्याचा फवारा उडाला होता.

[jwplayer 9xaU4cUi-1o30kmL6]