News Flash

जयंत सावरकर, विनायक थोरात यांना शासनाचा रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार जाहीर

५ लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे.

अभिनेते जयंत सावरकर

राज्य शासनामार्फत देण्यात येणारा नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना तर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मी विनायक थोरात यांना जाहीर झाला आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सोमवारी ही घोषणा केली. ५ लाख रुपये मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे.

जयंत सावरकर यांची वयाच्या विसाव्या वर्षापासून अभिनयाची कारकीर्द सुरु झाली. नोकरी सोडून पूर्णपणे नाटकातच काम करण्यास सासरे नटवर्य मामा पेंडसे यांचा विरोध असल्यामुळे नोकरी सांभाळून त्यांनी आपल्या अभिनयाची कारकीर्द अथक मेहनतीने घडवली. नाट्यसृष्टीत पदार्पण केल्यानंतर सुरुवातीची दहा वर्षे त्यांनी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम केले. त्यानंतर विजय तेंडूलकर लिखित ‘माणूस नावाचे बेट’ या नाटकामध्ये पहिल्यांदा सावरकरांना प्रेक्षकांसमोर कला सादर करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी अनेक दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केले. जयंत सावरकर यांनी आकाशवाणी केंद्रातही काम केले होते. आचार्य अत्रे यांच्या ‘सम्राट सिंह’ या नाटकात त्यांनी विदुषकाची भूमिका साकारली आणि ती प्रचंड गाजली होती.

त्याचबरोबर पं. विनायक थोरात यांनी तबल्याचे शिक्षण सुरुवातीला वडिलांकडे, नंतर यशवंतबुवा निकम यांच्याकडे शास्त्रोक्त शिक्षण घेतले. त्यानंतर रामकृष्णबुवा पर्वतकर यांच्याकडे पुढील शिक्षण झाले. सोलो वादनाचे कार्यक्रम सुरु असताना शिलेदारांच्या सहवासात आल्यावर संगीत नाटकांना साथ करायला सुरुवात केली. वयाच्या ५ व्या वर्षापासून जितेंद्र अभिषेकी, व्हायोलिन वादक डी. के. दातार, पं. भीमसेन जोशी, छोटा गंधर्व, मोगुबाई कुर्डीकर, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, किशोरी आमोणकर, राम मराठे, मालिनी राजूरकर, माणिक वर्मा, ज्योत्स्ना भोळे यांच्यासारख्या दिग्गज कलावंतांना तबला साथ करण्याचे भाग्य त्यांना मिळाले. त्यांचे विशेष स्नेहबंध जुळले ते शिलेदार कुटुंबियांशी. गाण्याबरोबर जाणारी आणि गायनावर कुरघोडी न करणारी त्यांची तबला साथ आजही रसिकांच्या स्मरणात आहे.

नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी प्रभाकर पणशीकर, विजया मेहता, भालचंद्र पेंढारकर, मधुकर तोरडमल, सुलभा देशपांडे, सुधा करमरकर, आत्माराम भेंडे, अरुण काकडे, श्रीकांत मोघे, रामकृष्ण नायक, लीलाधर कांबळी आणि बाबा पार्सेकर यांना प्रदान करण्यात आले आहेत.

तर, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार यापूर्वी फैय्याज, प्रसाद सावकार, जयमाला शिलेदार, अरविंद पिळगावकर, रामदास कामत, कीर्ती शिलेदार, रजनी जोशी, चंद्रकांत उर्फ चंदू डेगवेकर आणि निर्मला गोगटे यांना प्रदान करण्यात आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2018 7:21 pm

Web Title: jayant savarkar and vinayak thorat are honored by the governments theater life time achievment award
Next Stories
1 राष्ट्रीय पुरस्कार विजेता सुजय डहाकेची ‘सेक्स, ड्रग्ज & थिएटर’ मराठी वेब सीरिज लवकरच
2 शाहरुख खानविरोधात आमदाराची पोलिसांत तक्रार; ‘झिरो’ सिनेमावरुन वाद
3 दिवाळीच्या निमित्ताने ‘घाडगे & सून’, ‘हे मन बावरे’, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ मालिकांमध्ये घडणार या घडामोडी
Just Now!
X