अनुकंपा तत्त्वावर खास बाब म्हणून वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर

मधु कांबळे, मुंबई अंबेनळी येथील भीषण अपघातात मृत्यू पावलेल्या ३० जणांच्या वारसांना कोकण कृषी विद्यापीठात अनुकंपा तत्त्वावर नोकऱ्या देण्यास कृषी विभागाने तत्त्वत: मान्यता दिली आहे.

नोकरभरती आणि अनुकंपावरील नियुक्त्यासंबंधीचे काही नियम शिथिल करून विशेष बाब म्हणून मान्यतेसाठी हा प्रस्ताव वित्त विभागाला सादर करण्यात आला आहे. वित्त विभागाच्या मान्यतेनंतर त्याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती कृषी विभागातील सूत्राने दिली.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचारी २८ जुलै रोजी महाबळेश्वर येथे सहलीला जात असताना अंबेनळी घाटात भीषण अपघात होऊन बस खोल दरीत कोसळली. या अपघातात बसमधील ३० कर्मचारी जागीच ठार झाले. त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. त्यांना आधार देण्यासाठी विशेष बाब म्हणून शासनाचे प्रचलित नियम शिथिल करून मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर विद्यापीठाच्या सेवेत सामावून घेण्याचा प्रस्ताव विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कुलपतींना पाठविला होता. कुलपतींकडून पुढील कार्यवाहीसाठी हा प्रस्ताव कृषी विभागाकडे पाठविण्यात आला.  विभागाने त्यावर सकारात्मक भूमिका घेतली आहे.

अपघातात मरण पावलेल्यांमध्ये गट क वर्गातील २१ कर्मचारी होते आणि गट ब वर्गातील ९ अधिकारी होते. अतिशय शोककारक अशा दुर्घटनेत मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना आधार देण्यासाठी, प्रचलित नियम शिथिल करून सर्व मृत कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे अनुकंपा तत्त्वावर विद्यापीठाच्या सेवेत सामावून घेण्यास कृषी विभागाने तत्त्वत मान्यता दिली आहे.

झाले काय?

राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना अनुकंपा धोरण लागू आहे. कृषी विद्यापीठ ही स्वायत्त संस्था असल्याने हे धोरण लागू करण्यासाठी नियम शिथिल करावा लागणार आहे. नोकरभरती संदर्भात वित्त विभागाचे निर्बंध आहेत. त्यातून या विद्यापीठाला वगळावे लागणार आहे. त्याचबरोबर गट क व ड वर्गातील कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपावर सेवेत सामावून घेण्याचा नियम आहे. अधिकाऱ्यांना हे धोरण लागू नाही, त्यामुळे या प्रकरणात हा नियमही शिथिल करावा लागणार आहे. कृषी विभागाने त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय घेतला आहे. त्यावर कृषी विभागाने आपल्या स्तरावर त्याबाबत निर्णय घ्यावा, असा अभिप्राय या विभागाने दिला आहे.