भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे प्रतिपादन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या पाच वर्षांत उत्तम कामगिरी केल्याने जनतेला ‘अच्छे दिन’ आले आहेत, देश बदलला आहे, असे प्रतिपादन भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांनी रविवारी भाजपच्या विस्तारित प्रदेश कार्यसमितीच्या उद्घाटन सत्रात केले. भाजप कार्यकर्त्यांनी हे जनतेला आत्मविश्वासाने सांगण्याचे आवाहन नड्डा यांनी केले. युतीच्या २२० हून अधिक जागा निवडून येतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

देशाने गेल्या पाच वर्षांत सर्वच क्षेत्रांत प्रगती करून देशाची प्रतिष्ठा आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढविली आहे. देश बदलला आहे, जनतेला अच्छे दिन आले आहेत, हे विकास कामांच्या आकडेवारीतून दिसून येत असून तेच आपण जनतेला आत्मविश्वासाने सांगावे, अशी सूचना नड्डा यांनी कार्यकर्त्यांना केली.

आम्हाला काँग्रेसमुक्त म्हणजे भ्रष्टाचारमुक्त देश करायचा आहे. भाजपयुक्त म्हणजे सेवायुक्त भारत करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात राजकीय संस्कृतीमध्ये परिवर्तन केले आहे. जनतेने लोकसभा निवडणुकीत मतपेढीचे राजकारण नाकारून विकासाच्या राजकारणावर शिक्कामोर्तब केल्याचे नड्डा यांनी सांगितले. पक्षविस्ताराच्या कामाबाबत नड्डा यांनी कार्यकर्त्यांना सूचना केल्या.

महायुतीला २२० हून अधिक जागा

महायुतीला २२० हून अधिक जागा मिळतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. केवळ भाजपच्या उमेदवारांसाठीच नाही, तर मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या जागांवरही भाजपच लढत आहे, असे मानून २८८ जागांवर काम करावे, अशी सूचना पाटील यांनी केली. शिवसेनेबरोबर युतीचा निर्णय अध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे योग्य वेळी जाहीर करतील, असे स्पष्ट करून निवडणूक तयारीबाबत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री भाजपचाच – सरोज पांडे

विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असा विश्वास भाजपच्या महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे यांनी रविवारी गोरेगाव येथील नेस्को मैदानात झालेल्या मेळाव्यात व्यक्त केला. आपण सर्व २८८ जागा लढविणार असून कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असा दावा शिवसेना नेते करीत असले तरी भाजपने सर्व जागांवर निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. युतीचा निर्णय काहीही झाला, तरी पक्षाची तयारी सर्व जागांवर असली पाहिजे, या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. पक्षाच्या प्रभारी सरोज पांडे यांनी विरोधक कमजोर झाले असल्याचे सांगितले. दुबळ्या शत्रूवर हल्ला करून नेस्तनाबूत केले पाहिजे, असे चाणक्यनीती सांगते. त्यामुळे विरोधकांवर असा जबरदस्त हल्ला चढवा, की त्यांना पुन्हा रणमैदानात येण्याची ताकद राहणार नाही, असे पांडे यांनी स्पष्ट केले.