डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण  

मुंबई : सुनावणीस आलेली याचिका अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंधित असल्याचे सोमवारी चौथ्या सुनावणीत लक्षात आल्यानंतर न्या. मृदुला भाटकर यांनी ती ऐकण्यास नकार दिला. ही आव्हान याचिका आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांची आहे.

गेल्या तीन सुनावणींच्या वेळी डॉ. दाभोलकर यांच्या नावाचा एकदाही उल्लेख झालेला नाही वा आपण याचिकेवर दिलेल्या आदेशातही त्यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. हे प्रकरण मुळात त्यांच्या हत्येशी संबंधित आरोपींचे आहे हेच आपल्याला माहीत नव्हते. ते माहीत असते तर पहिल्या सुनावणीच्या वेळीच आपण ती ऐकण्यास नकार दिला असता. शिवाय ही बाब माहीत असती आणि त्यानंतरही आपण याचिका ऐकली असती तर ती आपली चूक ठरली असती. मात्र आरोपींवर ज्यांच्या हत्येचा आरोप आहे ते नाव आज वाचल्यानंतर ही बाब लक्षात आली. त्यामुळे आरोपींची याचिका आपण ऐकू शकत नाही, असे न्या. भाटकर यांनी स्पष्ट केले. डॉ. दाभोलकर हे आपल्या परिचयाचे होते. त्यांनी आपल्या काही कविताही प्रसिद्ध केल्या होत्या, असेही त्यांनी सांगितले.  अशा प्रकारची अनेक प्रकरणे आपल्यापुढे दररोज सुनावणीस  येतात. त्यात २०१३ मध्ये खून झालेल्या प्रकरणांचाही समावेश आहे. त्यामुळे हे प्रकरण डॉ. दाभोलकरांच्या हत्येशी संबंधित आहे, हे सुरुवातीच्या सुनावणीत लक्षात आले नाही; परंतु ही बाब कळल्यावर हे प्रकरण ऐकू शकत नाही, असेही न्या. भाटकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे हे प्रकरण आता दुसऱ्या एकलपीठाकडे सुनावणीस येईल.

अंदुरे आणि कळसकर डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत आहेत. त्यांनी त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी कनिष्ठ न्यायालयाने सीबीआयला दिलेल्या मुदतवाढीला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. वास्तविक नालासोपारा शस्त्रसाठाप्रकरणी या दोघांना राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली होती. त्यांच्या चौकशीत या दोघांनीच डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडल्याचे उघड झाल्यावर सीबीआयने त्यांना अटक करून तपासाला सुरुवात केली होती. मात्र पाच महिने उलटूनही सीबीआयने या दोघांविरोधात आरोपपत्र दाखल केलेले नाही. या दोघांविरोधात बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे दंडाधिकाऱ्यांनी नोव्हेंबरमध्ये या दोघांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यास सीबीआयला पुन्हा ४५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

हे प्रकरण मुळात डॉ. दाभोलकरांच्या हत्येशी संबंधित आरोपींचे आहे, हेच आपल्याला माहीत नव्हते. ते माहीत असते तर पहिल्या सुनावणीच्या वेळीच आपण ती ऐकण्यास नकार दिला असता. शिवाय ही बाब माहीत असती आणि त्यानंतरही आपण याचिका ऐकली असती तर ती आपली चूक ठरली असती.

– न्या. मृदुला भाटकर, उच्च न्यायालय