कॉटन ग्रीन येथे ट्रक मध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना पकडून देणाऱ्या दोन वाहनतळ सुरक्षा रक्षकांचा पोलिसातर्फे सत्कार केला जाणार आहे. याप्रकरणी पोलिसांनी भक्कम पुरावे गोळा केले असून आरोपींचा पुर्वेइतिहास तपासला जात आहे.
सोमवारी रात्री कॉटन ग्रीन रेल्वे स्थानकाच्या बाहेर असलेल्या वाहनतळाजवळ उभ्या असलेल्या एका ट्रक मध्ये या २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता. त्यावेळी या ठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या वाहनतळाच्या दोन सुरक्षा रक्षक आनंद काळे आणि नईम बोरी यांनी या तरुणीला पाहिले. त्यांनी या आरोपींना हटकले. त्यावेळी सलीन नूरहसन शेख (२१) हा तेथून पळून गेला. त्याचवेळी पोलिसांची गस्तीचे वाहन सुरू होते. कोळी आणि बोरी यांनी त्वरीत पोलिसांनी बोलावले आणि राहुल मंडल (२०) आणि पंचू खाकी (२१) या दोघांना घटनास्थळावरून रंगेहाथ पकडण्यात पोलिसांची मदत केली. त्यानंतर तासाभरातच पोलिसांनी रे रोड येथून सलीमला अटक केली.