मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती
मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेसाठी राज्यातील महत्त्वाच्या शहरांची नावे केंद्राकडे पाठविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. मुंबई, ठाणे, पुणे, नवी मुंबईसह कल्याण, अमरावती, सोलापूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक या शहरांचीही ‘स्मार्ट सिटी’साठी शिफारस करण्यात आली आहे. ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत शहरांचा विकास करण्यासाठी राज्यांच्या सरकारांना ३१ जुलैपर्यंत शहरांच्या नावांची यादी केंद्राकडे पाठविण्याची मुदत होती. त्यानुसार केंद्राकडे पाठविण्यात आलेल्या महाराष्ट्रातील शहरांच्या नावांची यादी फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्मार्ट सिटीची योजना संपूर्ण देशासाठी जाहीर केली आहे. त्यासाठी केंद्र सरकारचे भरघोस अनुदानदेखील मिळणार आहे. स्मार्ट सिटीमध्ये नियोजनबद्ध विकासाबरोबरच सर्व सोयी-सुविधांसह सीसी टीव्ही कॅमेरे, जीआयएस आराखडा, अ‍ॅटो डीसीआर, स्वयंचलित पार्किंग या आधुनिक सेवा महत्त्वाच्या मानल्या गेल्या आहेत. या नगरीत नागरिकांना सर्व सेवा ऑनलाइन उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.