हेमा उपाध्याय-हरेश भंभानी यांच्या कुटुंबीयांचा प्रश्न;उच्च न्यायालयात जाण्याचा इशार

हेमा उपाध्याय आणि तिचे वकील हरेश भंभानी यांच्या हत्येचा तपास कांदिवली पोलीस योग्य प्रकारे करत असताना कुणाच्या सांगण्यावरून हा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला, हे कळत नाहीये. ज्या गुन्हे शाखेला चिंतन उपाध्याय हाच कटाचा सूत्रधार आहे, हे सिद्ध करता आले नाही, त्याच गुन्हे शाखेकडे पुन्हा हत्येचा तपास देणे म्हणजे चिंतनच्या मुक्ततेसाठी प्रयत्न करणे, असा घणाघाती आरोप हेमा उपाध्याय-भंभानी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. गुन्ह्य़ाचा तपास पुन्हा कांदिवली पोलीस किंवा स्वतंत्र तपास यंत्रणेकडे दिला नाही, तर ६ जून रोजी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून आम्ही दाद मागू, असा इशाराही कुटुंबीयांनी दिला आहे.

कलाकार हेमा उपाध्याय आणि तिचे वकील हरेश भंभानी यांचे मृतदेह डिसेंबर २०१५ मध्ये कांदिवलीच्या डहाणूकरवाडीतील एका गटारात सापडले होते. कांदिवली पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत हेमासाठी काम करणाऱ्या विद्याधर राजभर याच्या कार्यशाळेतील तीन कामगार आणि तिचा पती चिंतन याला अटक केली असून विद्याधर अजूनही बेपत्ता आहे. वारंवार जामिनासाठी अर्ज करूनही न्यायालयाने चिंतनची विनंती फेटाळून लावली आहे. मात्र १८ मे २०१६ रोजी एकाएकी मुंबई पोलीस आयुक्तांनी या गुन्ह्य़ाचा तपास गुन्हे शाखा कक्ष ७ कडे सोपविण्याचा आदेश काढला. कुठलीही गरज नसताना तसेच कुणाचीही मागणी नसताना आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी हा निर्णय का घेतला, याचा थेट फायदा चिंतनला होईल, असा आरोप मृत हेमा आणि भंभानी यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. चिंतननेच या दोन्ही हत्या घडविल्याचे एका आरोपीने स्वतहून जबाबात म्हटले आहे, गुन्हे शाखा कक्ष ११ ने चिंतनला ताब्यात घेऊन चौकशी करूनही त्यांच्या हाताशी काहीच लागले नाही, परंतु, कांदिवली पोलिसांनी तातडीने त्याला अटक करून त्याचा हत्येत सहभाग असल्याचे सिद्ध केले. त्यामुळेच आजही तो तुरुंगात आहे. असे असताना कांदिवली पोलिसांकडून हा तपास काढून पुन्हा गुन्हे शाखेकडे देणे म्हणजे तपासाला जाणीवपूर्वक धक्का पोहोचविणे आहे, असा आरोप भंभानी यांची मुलगी अनिता भंभानी यांनी केला. कांदिवली पोलिसांचा तपास योग्य दिशेने आणि समाधानकारक सुरू असूनही हा निर्णय आयुक्तांनी का घेतला, हे कळण्यास मार्ग नसल्याचेही त्या म्हणाल्या. गुन्ह्य़ाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्याआधीच चिंतनच्या मित्रांना त्याची माहिती होती, असा आरोप हेमाचे वकील विनोद गंगवाल यांनी केला. मुख्यमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडेही   विनंती केली असून त्यांनी  लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली.

फरार विद्याधर आत्मसमर्पण करणार?

पत्रकार परिषदेत वकील गंगवाल यांनी हत्येतील फरार आरोपी विद्याधर राजभर आता पोलिसांपुढे आत्मसमर्पण करून सर्व गुन्ह्य़ाचा सूत्रधार आपणच असल्याचे मान्य करेल, ज्यामुळे चिंतन सुटण्याचा मार्ग मोकळा होईल, असा धक्कादायक खुलासा केला. मात्र, या खुलाशाला आधार कोणता हे विचारले असता, त्याविषयी अधिक बोलणे त्यांनी टाळले.