माझं ऑफिस तोडून ती जागा स्मशानभूमीसारखी करुन टाकली. त्यामुळे तिथे काम करणाऱ्यांचा रोजगार गेला. एका फिल्म युनिटमुळे काही शे लोकांचा उदरनिर्वाह चालतो. एक सिनेमा रिलिज होऊन थिएटरपर्यंत पोहचतो तेव्हा तो पॉपकॉर्न विकणाऱ्याचंही घर चालवतो. अशा सगळ्यांचे रोजगार हिरावणारे लोक आज राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करत आहेत. या आशयाचं ट्विट करत कंगना रणौतने शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. कंगनाने तिच्या ऑफिशियल ट्विटर हँडवर तिच्या ऑफिसवर जी तोडक कारवाई करण्यात आली त्याचे फोटो पोस्ट केले आहेत. ते पोस्ट करुन तिने शिवसेनेवर नाव न घेता टीका केली आहे.

कंगना रणौतने मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटते असं वक्तव्य केलं होतं. ज्यावरुन तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. खास करुन शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यात कंगनामध्ये ट्विटर वॉरही रंगलं होतं. तसंच अनेक कलाकारांनीही कंगनावर तिच्या वक्तव्यामुळे टीका केली होती. त्यानंतर ९ सप्टेंबरला मुंबईत येते आहे कुणाच्या बापाची हिंमत असेल तर मला अडवून दाखवा असंही कंगनाही ट्विट करुन म्हटलं होतं. यानंतर जेव्हा ती ९ तारखेला मुंबईत आली त्यावेळी मुंबई महापालिकेने तिच्या मुंबईतल्या ऑफिसचा बेकायदेशीर असलेला भाग तोडला. या कारवाईमुळे चिडलेल्या कंगनाने कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे आणि २ कोटींची भरपाई मागितली आहे.

दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असल्याने ट्विटरवर #NationalUnemploymentDay17Sept हा हॅशटॅग ट्रेंड होतो आहे. हाच धागा उचलून कंगनाने शिवसेनेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. तिने तिच्या तोडलेल्या ऑफिसचे फोटो ट्विट केले आहेत. त्यानंतर ज्यांनी माझं ऑफिस तोडलं आणि लोकांचा रोजगार हिरावला तेच लोक आज राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करत आहेत अशी टीका केली आहे. आता कंगनाच्या या टीकेला शिवसेना काही उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.