उत्कर्ष आनंद, एक्स्प्रेस वृत्त.
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीलाही बुधवारी रोषाला सामोरे जावे लागले. पतियाळा न्यायालयाच्या संकुलात आमच्यावर कुंडय़ा, बाटल्या फेकण्यात आल्या आणि ‘पाकिस्तान के दल्ले’ असे संबोधण्यात आले, असे या समितीने न्यायालयासमोर स्पष्ट केले.
जेएनयू विद्यार्थ्यांचा नेता कन्हैया कुमार याला न्यायालयात सादर करताना संकुलात हिंसाचाराचा उद्रेक झाला त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने कन्हैया कुमारच्या सुरक्षेबाबत दिल्ली पोलीस आयुक्त बी. एस. बस्सी यांना जबाबदार धरले. कन्हैया कुमार, पत्रकार आणि वकिलांना कोणतीही इजा झालेली नाही याची न्या. जे. चेलमेश्वर आणि न्या. अभय सप्रे यांना दिवसातून दोनदा खातरजमा करून घ्यावी लागली, कन्हैया कुमार यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याबाबतचा अहवाल न्यायालयाने दिल्ली पोलिसांकडून मागविला आहे. न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीने स्पष्ट केले की, आरोपीला न्यायालयात हजर केले जात असताना मारहाण करण्यात आली. त्यामुळे त्याच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलीस आयुक्तांची असल्याचे पीठाने स्पष्ट केले. समितीमधील सदस्यांवरही कुंडय़ा आणि बाटल्या फेकण्यात आल्या आणि ‘पाकिस्तान के दल्ले’ असे संबोधण्यात आले, असेही सदस्यांनी सांगितले.

2