01 March 2021

News Flash

नवे वर्ष खगोलप्रेमींसाठी पर्वणी

तीन सूर्य, दोन चंद्र अशी पाच ग्रहणे; मुंबईतून खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार

तीन सूर्य, दोन चंद्र अशी पाच ग्रहणे; मुंबईतून खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार

येत्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या नव्या वर्षांमध्ये तीन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे अशी एकूण पाच ग्रहणे पाहण्याचा योग जुळून आला असून नऊ वर्षांनी भारतातून ग्रहणे पाहण्याची संधी मिळणार असल्यामुळे हे वर्ष खगोलप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. तर आगामी वर्षांमध्ये केवळ दोन सुट्टय़ा रविवारी आल्याने चाकरमान्यांची चंगळ होणार आहे.

नव्या वर्षांत (२०१९) तीन सूर्य ग्रहणे आणि दोन चंद्र ग्रहणे अशी एकूण पाच ग्रहणे होणार आहेत. त्यापैकी १६ जुलै रोजी होणारे खंडग्रास चंद्रग्रहण आणि २६ डिसेंबर रोजी होणारे कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे. दक्षिण भारताताली कोईम्बतूर, कन्नूर, मंगलोर, उटी या ठिकाणांहून सूर्यग्रहणाच्या कंकणाकृती स्थितीचे दर्शन घडणार आहे. मुंबईमधूनही हे सूर्यग्रहण खंडग्रास स्थितीत दिसणार असून ८५ टक्के सूर्य ग्रासित दिसणार आहे. यापूर्वी १५ जानेवारी २०१० रोजी झालेले कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून दिसले होते. मात्र ११ नोव्हेंबर २०१९ रोजी होणारे बुधाचे अधिक्रमण भारतातून दिसणार नाही. तथापि, २१ जानेवारी २०१९ आणि १९ फेब्रुवारी २०१९ रोजी रात्री आकाशात सुपरमून दिसणार आहे, असे खगोलअभ्यासक पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

पुढील वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, दिवाळी लक्ष्मीपूजन आणि ईद – ए – मिलाद या तीन सुट्टय़ा रविवारी येत असून उर्वरित २१ सुट्टय़ा इतर वारी येत आहेत. त्यामुळे पुढील वर्षी सुट्टय़ांची चंगळ होणार नाही. नूतन वर्षी चारच दिवस दिवाळी असणार आहे. वसुबारस व धनत्रयोदशी एकाच दिवशी २५ ऑक्टोबर रोजी येत आहे. तर २७ ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी व लक्ष्मीपूजन येत आहे. २८ ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदा व २९ ऑक्टोबर रोजी भाऊबीज आहे, असे ते म्हणाले.

नव्या वर्षांत ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे तीन महिने वगळता इतर नऊ महिने विवाहाचे मुहूर्त आहेत. त्यामुळे विवाहेच्छुकांसाठी आनंदाची बातमी आहे. तसेच सोने खरेदी करणाऱ्यांसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नव्या वर्षांत ६ जून, ४ जुलै आणि १ ऑगस्ट रोजी गुरुपुष्ययोग येणार आहे.

संवत वर्ष आणि ग्रेगोरिअन वर्ष यामध्ये फरक राहू नये असा जरी प्रयत्न करण्यात आला असला तरी संपातीय वर्ष आणि ग्रेगोरिअन वर्ष यामध्ये ०.०००३ दिवसांचा फरक पडत आहे. त्यामुळे तीन हजार वर्षांनी एक दिवसाचा फरक पडणार आहे. त्यावेळी तो दिवस सामाहून घ्यावा लागणार आहे, असेही दा. कृ. सोमण यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 12:05 am

Web Title: khandgras eclipse in mumbai
Next Stories
1 कर्जमाफीची कर्नाटकमध्ये थट्टा
2 निवडणुका हरल्यानंतर मोदींना शेतकऱ्यांची आठवण-काँग्रेस
3 फिलिपिन्समधील सुनामीचा इशारा अखेर मागे
Just Now!
X