संजय बापट

दीड लाख हेक्टर क्षेत्र दुष्काळाने बाधित; उसालाही रोगाचा प्रादुर्भाव

अपुऱ्या  पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके धोक्यात आली असून त्यांना वेळीच पाणी मिळाले नाही तर  खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती नैसर्गिक आपत्ती कक्षाने वर्तविली आहे. राज्यातील दीड लाख हेक्टरवरील पिके पाण्याअभावी धोक्यात आली आहेत. तसेच हुमणी रोगाच्या प्रादुर्भावामुळे एकटय़ा सोलापूर जिल्ह्य़ातील १२ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस धोक्यात आला आहे.

मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीतही दुष्काळी परिस्थितीबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली. ही पिके वाचविण्यासाठी आणि लोकांना पुरेसे पिण्याचे पाणी मिळावे यासाठी अर्धवट स्थितीतील सुमारे एक हजार पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

राज्यात यंदा सरासरीच्या ७५.८ टक्के पाऊस झाला असून सर्वात कमी पावसाची नोंद सोलापूर तर सर्वाधिक पावसाची नोंद सातारा जिल्ह्यात झाली आहे. सोलापूर,नाशिक, नंदूरबार, जळगाव,अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद,जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, बुलढाणा, भंडारा आणि चंद्रपूर या जिल्ह्य़ांत ७५ टक्के पेक्षा कमी पाऊस झाल्याने १७२ तालुक्यांवर दुष्काळाचे संकट घोंघावत आहे. त्यातच भूजलपातळी खाली गेल्याने उस्मानाबाद जिल्ह्य़ाातील कळंब,उस्मानाबाद, परांडा,तूळजापूर, वाशी तसेच सांगली जिल्ह्य़ातील तासगाव आणि सोलापूरमधील दक्षिण सोलापूर या तालुक्यांचा समावेशही दुष्काळी तालुक्यात करण्यात आल्याने दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या तालुक्यांची संख्या १७९ झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार मंत्र्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जिल्ह्य़ातील परिस्थितीचा अहवाल  मुख्यमंत्र्यासमोर मांडला.  राज्यातील परिस्थिती गंभीर असून केंद्राच्या निर्णयाची वाट न पाहता राज्य सरकारच्या वतीने जनेतेला दिलासा देणारा निर्णय घ्यावा लागेल अशी भूमिका अनेक मंत्र्यानी मांडली. तसेच पहिल्या दोन टप्प्यात दुष्काळी परिस्थितीचे निकष पूर्ण करणाऱ्या १७९ तालुक्यात  १० टक्के गावे सरसकट पद्धतीने निवडून तेथील पिकांचा वास्तववादी अहवाल आठ दिवसात सादर करण्याचे निर्देशही सर्व जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. पाण्याची स्थिती गंभीर असल्याचे बहुसंख्य मंत्र्यानी सांगितल्यानंतर, अर्धवट स्थितीत असलेल्या सुमारे एक हजार पाणी पुरवठा योजना तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

तसेच ज्या भागात पाणी पुरवठा योजनांची आवश्यकता आहे किंवा दुरूस्तीचे गरज आहे अशी कामेही प्राधान्याने घेण्याचा निर्णय बैठकीत झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

धोका काय?

कापूस, सोयाबीन, तूर, भात, कांदा, ज्वारी, बाजरी, नाचणी, मुग आदी पिके पुरेसे पाणी न मिळाल्यास अडचणीत येतील तसेच राज्यातील अन्य क्षेत्रातील पिकेही पाण्याअभावी संकटात येण्याची शक्यता अहवालात वर्तविण्यात आली आहे. यंदा ही पिके फुकट गेल्यास अन्नधान्य आणि भाज्यांच्या किंमती वाढतील.

पीक करपणार?

राज्यात खरीप पिकांचे ऊसासह सरासरी क्षेत्र १४९.७४ लाख हेक्टर असून यंदा ९४ टक्के  क्षेत्रावर पेरणी, लागवड झाली आहे. मात्र दुष्काळामुळे ही पिके शेतातच वाळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नैसर्गिक आपत्ती शाखेच्या प्राथमिक अहवालानुसार यवतमाळमध्ये ४६ हजार ६४२ हेक्टर, चंद्रपूरमध्ये ११ हजार १६१ हेक्टर, नांदेडमध्ये ७१ हजार ३४९, जळगाव २५४, गडचिरोली नऊ हजार ६४२, नंदूरबार ६१५, धुळे८५८, सातारा ३१८ आणि सांगली जिल्ह्य़ात ४०९ हेक्टर असे एक लाख ४१ हजार २५५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

मंत्र्यांनी राज्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली असून त्याचा प्राथमिक अहवाल सादर केला आहे. पाण्याची समस्या अधिक भेडसावण्याची शक्यता असून त्यासाठी अपूर्ण पाणी पुरवठा योजना प्राधान्याने पूर्ण करण्याचे आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये साठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्यात येणार आहेत.

– चंद्रकांत पाटील, महसूलमंत्री