२००३ साली ख्वाजा युनूसच्या पोलीस कस्टडीतील हत्या प्रकरणात बडतर्फ करण्यात आलेल्या ४ पोलीस अधिकाऱ्यांना अखेरीस पुन्हा एकदा मुंबई पोलिसांच्या सेवेत दाखल करुन घेण्यात आलं आहे. मुंबईत घाटकोपर येथील बॉम्बस्फोटातील सहभागावरुन मुंबई पोलिसांनी मुळचा परभणीचा रहिवासी असलेल्या ख्वाजा युनूसला दुबईवरुन मुंबईत परतताना २५ डिसेंबर २००२ साली अटक केली होती.

चौकशीदरम्यान ख्वाजा युनूसला घेऊन जात असताना नगरच्या पारनेरजवळ पोलिसांच्या गाडीला अपघात झाला होता. यावेळी ख्वाजा युनूस संधीचा फायदा उचलत पळून गेला असा जबाब क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदवला होता. मात्र पोलीस कस्टडीत छळ केल्यामुळे ख्वाजा युनूसचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी सचिन वाझे आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांवर केला होता. या प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवण्यात आल्यामुळे चारही पोलीस अधिकाऱ्यांना न्यायालयाने बडतर्फ केलं होतं.

अखेरीस १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या आदेशानुसार, सचिन वाझे, राजेंद्र तिवारी, सुनील देसाई आणि राजाराम निकम या चारही अधिकाऱ्यांना पुन्हा एकदा सेवेत दाखल करुन घेण्यात आलं आहे. यापैकी वाझे, तिवारी आणि देसाई यांनी Local Arm’s Unit मध्ये ड्युटी सुरु केली असून, राजाराम नाईक हे Motar Vehicle Department मध्ये रुजू झाले आहेत. बडतर्फ पोलीस अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत दाखल करुन घेण्यासाठी मुंबई पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली, ज्यात चारही अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत दाखल करुन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान ख्वाजा युनूस प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ आहे.