मैत्रिणीला धडा शिकविण्यासाठी तरुणाचे कृत्य
मैत्रिणीला धडा शिकविण्यासाठी तिच्या दोन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून पळून गेलेल्या तरुणाला मालवणी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत सुरतहून अटक केली आहे. मैत्रिणीने संबंध तोडल्याने संतापाच्या भरात या तरुणाने तिच्या मुलाचे अपहरण केले होते.
मालाड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या रेश्मा पाटील (३०) हिने शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास आपला दोन वर्षांचा मुलगा अर्णव याला आपला मित्र शाम मंडल याने पळविल्याची तक्रार दिली. मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले यांनी महेशकुमार ठाकूर, अमृत पवार, संदीप पाचांगणे, दिलीप साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली पथकाची नेमणूक केली. श्याम आणि रेश्मा यांची पाच वर्षांपासून मैत्री असल्याचे चौकशीत समोर आले. गोरेगाव पश्चिम येथील जैन हॉस्पिटल येथे दोघेही कामाला होते. मात्र सहा महिन्यांपूर्वी या दोघांचे भांडण झाले. त्यानंतर रेश्माने त्याच्याशी संबंध तोडून टाकले. गेल्या काही दिवसांपासून रेश्माने मुलगा अर्णव याला मालवणीच्या आझमीनगर येथे राहणाऱ्या बहिणीकडे ठेवले होते. शनिवारी दुपारी श्याम रेश्माच्या घरी आला व तिला मारहाण केली.
त्यानंतर श्याम रेश्माच्या बहिणीकडे गेला व अर्णवला फिरवून आणतो, असे सांगून त्याला घेऊन गेला. बहिणीने याबाबत रेश्माला कळवल्यानंतर तिने मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीस चौकशीत श्याम मूळचा बिहार राज्यातला असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, दोन वर्षांच्या मुलाला घेऊन श्याम बिहारला जाणार नाही, असा कयास पोलिसांनी बांधला. त्याचा एक नातेवाईक सुरत येथे राहत असल्याचा उल्लेख त्याने एका सहकाऱ्याकडे केला होता. तसेच त्याने मित्राकडून १० हजार रुपये उसने घेतले होते. यावरून श्याम सुरतलाच गेला असेल, असा कयास बांधून पोलिसांनी सुरतकडे धाव घेतली. रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्यामला रेल्वेस्थानक परिसरातून अटक करण्यात आली व अर्णवची सुटका झाली.