घरात गरिबीची परिस्थिती.. त्यात आरोग्य धड नाही, दोन्ही मूत्रपिंडे निकामी झालेली.. त्यात एचआव्हीची लागण.. डायलिसिसाठी महिन्याकाठी ३६ हजार रुपये आणायचे कुठून हा मोठा प्रश्न.. ही सर्व कर्मकहाणी आहे राजेश (नाव बदलले आहे) या २७ वर्षीय तरुणाची. मात्र, त्याच्या वडिलांनी मुलासाठी मूत्रपिंड दान करण्याची तयारी दर्शवली. त्यातही राजेशचे दुर्दैव आड आले. वडिलांच्या मूत्रपिंडात तब्बल दीड सेंटिमीटरचा खडा आढळला. मूत्रपिंडात खडा असल्यास ते दुसऱ्या रुग्णाला बसवण्याचे टाळले जाते. मात्र, केईएममधील वैद्यकीय तज्ज्ञांनी हे आव्हान स्वीकारले. आणि आज राजेश खडखडीत बरा झाला आहे. सार्वजनिक रुग्णालयात मूत्रपिंड प्रत्यारोपणाची ही अवघड शस्त्रक्रिया यशस्वी होण्याचा हा देशातील पहिलाच प्रयोग..
केईएममधील नेफ्रॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. निवृत्ती हासे आणि युरॉलॉजी विभागप्रमुख डॉ. सुजाता पटवर्धन यांनी राजेशची आरोग्यस्थिती आणि त्याच्या वडिलांच्या मूत्रपिंडात असलेल्या खडय़ामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा अभ्यास केला आणि शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यात धोका होता, पण तो पत्करत राजेशच्या वडिलांचे एक मूत्रपिंड काढल्यानंतर त्यातून दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करून मूतखडा काढला. आणि ते मूत्रपिंड राजेशला बसवले.
महिन्याकाठी ३६ हजार रुपये खर्च
राजेशची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झालेली त्यातच त्याला एचआयव्हीची लागणही झाली. त्यामुळे डायलिसिससाठी राजेशला महिनाकाठी ३६ हजार रुपये खर्च येत होता. प्रथम पुण्यात त्याने उपचार करून घेतले. मात्र, खर्च परवडेनासा झाला. केईएममध्ये शस्त्रक्रिया होते याची माहिती मिळताच राजेशच्या वडिलांनी एक मूत्रपिंड देण्याची तयारी दर्शवली. गेले आठ महिने एकीकडे राजेशचे डायलिसीस तसेच सीडी-४ काऊंट योग्य यावा यासाठी डॉक्टर हासे व त्यांच्या पथकातील डॉ. तुकाराम जमाले, डॉ. वैभव व डॉ. अनिरुद्ध यांनी विशेष मेहनत घेतली. त्याचवेळी त्याच्या वडिलांची सर्व प्रकारची वैद्यकीय तपासणी व आवश्यक त्या शासकीय परवानग्याही घेण्यात आल्या. युरॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. सुजाता पटवर्धन यांनी शस्त्रक्रियेची सारी तयारी केली. मूत्रपिंडातील खडाही काढण्यात आला. अखेरीस राजेशवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पाऊण महिन्यापूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉ. इस्माइल व डॉ. अभिषेक यांची यात मोलाची मदत झाली. येत्या दोन दिवसत राजेशला घरी पाठविण्यात येणार आहे.