सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगानं व्हायरल होणारे किकी चॅलेंज लोकल ट्रेनमध्ये करणे तीन तरुणांना महागात पडले आहे. आरपीएफने विरारमधून निशांत (वय २०), ध्रूव शाह (वय २३) आणि श्याम शर्मा (वय २४) या तिघांना बुधवारी अटक केली.

विरार स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर लोकल ट्रेनमध्ये किकी चॅलेंज पूर्ण केल्याचा प्रकार समोर आला होता. हा व्हिडिओ फंचो इंटरटेनमेंटच्या इन्स्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूबवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओदेखील व्हायरल झाला होता. व्हिडिओ ध्रूव शहा आणि त्याच्या दोन मित्रांनी तयार केला होता. या व्हिडिओत एक तरुण लोकलमधून उतरतो आणि प्लॅटफॉर्मवर डान्स करायला लागतो, त्यानंतर पुन्हा तो धावत्या लोकलमध्ये चढतो. हा सर्व प्रकार त्याचे दोन मित्र मोबाईलवर शूट करत असल्याचे दिसत होते.

पश्चिम रेल्वेने या व्हिडिओची दखल घेत कारवाईचा निर्णय घेतला होता. यानुसार रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने विरारमधून ध्रूव आणि त्याच्या दोन मित्रांना अटक केली. यातील निशांतने मालिकेत काम केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. ‘व्हिडिओ समोर येताच आम्ही खबरी कामाला लावले होते. त्यांनी या तरुणांची माहिती आम्हाला दिली. बुधवारी सकाळी या तिघांसाठी पोलिसांनी सापळा रचला आणि सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांना अटक केली, अशी माहिती आरपीएफचे विभागीय आयुक्त अनूप शुक्ला यांनी दिली.