ईशान्य मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांच्याबरोबरच आणखी एका नावाची शिफारस करण्याची सूचना केंद्रीय नेतृत्वाने राज्यातील नेत्यांना केल्याने सोमय्या यांची उमेदवारी अडचणीत येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

राज्यातील उमेदवारांची नावे निश्चित करण्याकरिता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राज्यातील नेत्यांशी शनिवारी मध्यरात्री चर्चा केली. या चर्चेत ईशान्य मुंबई मतदारसंघासाठी आणखी एक नाव सुचवावे, असे राज्यातील नेत्यांना सांगण्यात आले. त्यानुसार सोमय्या यांच्याबरोबरच आणखी एका नावाची शिफारस संसदीय मंडळाला करण्यात आली. सोमय्या यांनी गेल्या साडेचार वर्षांत सातत्याने शिवसेनेला लक्ष्य केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक आरोप केले होते. याचा शिवसैनिकांमध्ये कमालीचा राग आहे. युतीसाठी शिवसेनेने प्रतिसाद दिल्याने शिवसेनेला दुखाविण्याची भाजपची तयारी दिसत नाही. सोमय्या यांचे नाव मंजूर झालेल्या १६ मतदारसंघांच्या उमेदवारांमध्ये नाही, असेही भाजपच्या गोटातून सांगण्यात आले.