११/७ च्या मुंबई रेल्वे बॉम्बस्फोटात जखमी झाल्यानंतर कोमात गेलेल्या पराग सावंत यांच्यावरील उपचारप्रकरणी किरीट सोमय्यांनी शनिवारी हिंदुजा रूग्णालयावर टीकेची झोड उठविली. हिंदुजा रूग्णालयाने परागच्याबाबतीत उपचार नव्हे तर व्यवसाय केला, अशी घणाघाती टीका त्यांनी केली. गेल्या नऊ वर्षांपासून हिंदुजा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पराग सावंत यांचे मंगळवारी निधन झाले होते. त्यानंतर हिंदुजा रुग्णालयाने उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमॉर्टेम) पराग सावंत यांचे पार्थिव बराच काळ रुग्णालयातच ठेवले होते. मुळात नऊ वर्षांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या व्यक्तीचे पार्थिव पोस्टमॉर्टेमच्या कारणामुळे तिष्ठत ठेवण्याची गरजच काय होती, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. तसेच गेल्या नऊ वर्षांत परागवरील उपचारासाठी सरकारकडून कोट्यावधींचे बिल हिंदुजा रुग्णालयाकडून वसूल केले आहे. त्यामुळे हिंदुजा रुग्णालयाचा हेतू केवळ व्यवसाय करण्याच होता, असा आरोप करत सोमय्यांनी हे प्रकरण राज्याच्या वैद्यकिय समितीसमोर मांडणार असल्याचे सांगतिले.