ठाणे महापालिकेच्या महिला वसतिगृहातील प्रकार

ठाणे : ठाणे येथील खोपट भागातील महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयामधील विद्यार्थिनीसाठी असलेल्या वसतिगृहातील ४० वर्षीय महिला सुरक्षारक्षकावर एका तरुणाने चाकूने जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी घडला. या हल्ल्यात महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे.

हल्लेखोर तरुणाला नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नोकरीचे आमिष दाखवून महिला सुरक्षारक्षकाने हल्लेखोराकडून पैसे घेतले होते आणि त्याला नोकरी मिळवून देत नव्हती. त्यामुळे त्याने हा प्रकार केल्याची बाब पोलिसांच्या प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

विकास धनावडे (३५) असे हल्लेखोराचे नाव असून त्याला नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. खोपट येथील हंसनगर भागात महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी वसतिगृह आहे. या वसतिगृहामध्ये सुरक्षारक्षकाचे काम करणाऱ्या ४० वर्षीय महिलेवर विकास याने मंगळवारी सायंकाळी चाकूने वार केले. दोन्ही हातावर आणि गळ्यावर वार करण्यात आल्यामुळे ती गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर परिसरातील तिघा तरुणांनी धाव घेत तिला ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिला मुंबईतील जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले. हल्ला केल्यानंतरही विकास हा चाकू घेऊन घटनास्थळीच उभा होता. या प्रकारामुळे वसतिगृहातील विद्यार्थिनीसह परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, या प्रकाराबाबत माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन विकासला ताब्यात घेतले. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

म्हणून हल्ला?

या संदर्भात नौपाडय़ाचे पोलिस निरीक्षक संजय धुमाळ यांच्याशी संपर्क साधला असता, विकास हा खासगी सुरक्षारक्षकाचे काम करतो. चार वर्षांपुर्वी त्याची त्या महिलेसोबत ओळख झाली होती. या ओळखीतून तिने विकासला सुरक्षारक्षक महामंडळात नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून ५५ हजार रुपये घेतले होते. मात्र, पैसे देऊनही नोकरी मिळत नव्हती आणि त्यात ती त्याला टाळत होती. त्यामुळे त्याने हा प्रकार केल्याची बाब तपासात समोर आल्याची माहिती त्यांनी दिली.