कुर्ल्याच्या गुलाब इस्टेटमध्ये स्पेअर पार्ट्च्या गोदामांना आग लागल्याची घटना घडली आहे. कुर्ल्यातल्या मकसूद गल्लीमधल्या गोदामांना आग लागली आहे. हा परिसर चिंचोळ्या गल्ल्यांचा असल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यात मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागला. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ४ गाड्या पोहोचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात येत आहेत. ही आग नेमकी कशी लागली, याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या आगीमध्ये जीवितहानी झाल्याचं अद्याप वृत्त आलेलं नसलं, तरी आगीचं स्वरूप पाहाता आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाल्याचा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त केला जात आहे.

 

दरम्यान, ही आग एकापाठोपाठ आजूबाजूच्या गोदामांमध्ये देखील पसरू लागली आहे. त्यामुळे चिंचोळ्या गल्ल्यांमधून वाट काढून घटनास्थळी पोहोचण्यासोबतच वेगाने पसरणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं देखील आव्हान अग्निशमन दलासमोर आहे.

“झाडूच्या एका कारखान्याला ही आग लागली आहे. या परिसरात अनेक बेकायदेशीर गोदामं आहेत. याबाबत मी पालिकेकडे अनेकदा तक्रार केली आहे. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही”, अशी माहिती स्थानिक आमदार संजय पोतनीस यांनी दिली आहे.