* डोंबिवली स्थानकात सोयीसुविधांचा अभाव
* गर्दीच्या वेळी खास डोंबिवली लोकलची संख्याही कमी
प्रवासी संख्येच्या बाबतीत मध्य रेल्वेवरील अव्वल दहा स्थानकांत डोंबिवली स्थानकाचा क्रमांक पहिला असल्याने डोंबिवलीकर सुखावले असले, तरी प्रत्यक्षात या प्रवासी संख्येच्या तुलनेत डोंबिवलीकर प्रवाशांच्या पदरात पडणाऱ्या सोयीसुविधांचे प्रमाण मात्र व्यस्तच आहे. अपुरी प्रसाधनगृहे, अस्वच्छ प्लॅटफॉर्म, सरकत्या जिन्यांचा अभाव आणि खास डोंबिवली स्थानकातून गर्दीच्या वेळी सुटणाऱ्या कमी गाडय़ा या सर्वामुळे मध्य रेल्वेच्या यादीत अव्वल असलेला डोंबिवलीकर प्रवासी संत्रस्त आहे. मध्य रेल्वेला उपनगरीय सेवेतून सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या स्थानकाकडे रेल्वे प्रशासनाचे होणारे दुर्लक्ष अक्षम्य असल्याची प्रतिक्रिया प्रवासी संघटना व्यक्त करत आहेत.
प्रसाधनगृहे आहेत कुठे?
ठाणे स्थानकात डिलक्स प्रसाधनगृह सुरू झाल्यानंतर अशाच प्रकारचे प्रसाधनगृह डोंबिवली स्थानकात सुरू करणार असल्याचे सूतोवाच रेल्वे प्रशासनाने केले होते. त्यासाठी इरादापत्रेही मागवली होती. मात्र कोणीच पुढे आलेले नाही. डोंबिवली स्थानकात सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचच्या मध्यभागी असलेले एक, प्लॅटफॉर्म क्रमांक एक-दोनच्या ठाणे टोकाला आणि कल्याण टोकाला असलेली दोन अशी तीनच स्वच्छतागृहे आहेत. या स्वच्छतागृहांची अवस्था वर्णन करतानाही नाक मुठीत धरावे लागेल, इतकी बिकट आहे. दर दिवशी सरासरी अडीच लाख प्रवासी प्रवास करणाऱ्या या स्थानकातील तीनही प्रसाधनगृहांची क्षमता शंभर प्रवाशांसाठीही पुरेशी नाही. त्यामुळे खासकरून महिला प्रवाशांची प्रचंड गरसोय होते. मात्र याकडे रेल्वे प्रशासनाचे लक्ष नाही. विशेष म्हणजे प्रसाधनगृह उभारण्यासाठी रेल्वेकडे जागाही नसल्याचे सांगण्यात येते.
सरकते जिने अद्यापही हवेतच
डोंबिवली स्थानकात सरकते जिने बसवण्याबाबत मध्य रेल्वेने पुढाकार घेतला होता. मात्र पूर्वेकडे स्थानकाबाहेरून पुलावर चढण्यासाठीचा सरकता जिना वगळल्यास अद्याप एकही सरकता जिना रेल्वेने बसवलेला नाही. या सरकत्या जिन्यांची सर्वात जास्त गरज प्लॅटफॉर्मवर असताना पाचपकी एकाही प्लॅटफॉर्मसाठी सरकत्या जिन्यांचा विचार अद्यापही केलेला नाही. त्यामुळे या स्थानकातून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास होतो.
कल्याणच्या टोकाचा अरूंद पूल
डोंबिवली स्थानकात कल्याणच्या दिशेला असलेला अरूंद पूल ही प्रवाशांसाठी अडचण बनत आहे. गर्दीच्या वेळी या पुलावर प्रचंड चेंगराचेंगरी होत असते. तसेच प्लॅटफॉर्मवरून या पुलावर चढण्यासाठी असलेले जिनेही अत्यंत अरूंद आहेत. प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून या पुलावर चढण्यासाठी बाजूबाजूला दोन अरुंद जिने असून त्याच्या पायऱ्या झिजल्या आहेत. पावसाळ्यात त्यावरून प्रवासी घसरण्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र अद्याप त्याबाबत काहीच कारवाई झालेली नाही. त्याचप्रमाणे या पुलावर अनेक फेरीवाले ठिय्या मांडून बसलेले असतात. त्यांच्यामुळे वाट अडते आणि प्रवाशांना आणखी त्रास होतो. महिन्यातील एक-दोन दिवस वगळता रेल्वे सुरक्षा दलाचे जवानही या फेरीवाल्यांपर्यंत फिरकत नाहीत.
गाडय़ांची संख्या कमीच
सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या या स्थानकातून सकाळी गर्दीच्या वेळी डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेने सुटणाऱ्या गाडय़ांची संख्या अत्यंत कमी आहे. डोंबिवलीहून मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा दादर येथे संपूर्ण दिवसभरात फक्त ३० गाडय़ा जातात. त्यापकी बहुतांश गाडय़ा दुपारी आणि संध्याकाळी, म्हणजेच कमी गर्दीच्या वेळी सुटतात. म्हणजेच सकाळी ऐन गर्दीच्या वेळी जेमतेम चार ते पाच गाडय़ा डोंबिवलीहून सुटतात. यापकी जलद गाडीची संख्या एकच असून तीदेखील ठाण्यापर्यंत सर्व स्थानकांवर थांबते. तसेच मुंबईहून सुटणाऱ्या डोंबिवली लोकलची संख्याही दिवसभरात २६ एवढीच आहे. त्यातही संध्याकाळी गर्दीच्या वेळी फक्त ४-५ गाडय़ा डोंबिवलीकडे रवाना होतात. सकाळी गर्दीच्या वेळी डोंबिवलीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाचवरून जलद गाडी पकडणे, हे मोठे दिव्य असते.
महसूल मिळतो,
मग सोयीही पुरवा!
डोंबिवली स्थानकातून दर दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ठाणे स्थानकापेक्षाही जास्त आहे, हे रेल्वेची आकडेवारीच सांगते. म्हणजेच उपनगरीय स्थानकांच्या यादीत डोंबिवलीतून मिळणारा महसूल सर्वाधिक आहे. आता रेल्वेने या स्थानकातील प्रवाशांसाठी सोयीसुविधा पुरवतानाही हात सढळ ठेवायला हवा. तसेच गर्दीच्या वेळी सकाळी खास डोंबिवलीकरांसाठी एक पूर्ण जलद गाडीही सोडायला हवी.
नंदकुमार देशमुख, अध्यक्ष.
उपनगरीय प्रवासी एकता महासंघ