चिंचपोकळी येथील चिंतामणी गणपतीचे शनिवारी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पण काही अतिउत्साही तरूणांमुळे या मिरवणुकीला गालबोट लागल्याचे दिसून आले. मिरवणुकीमुळे लालबाग आणि परळ परिसरातील डॉ. आंबेडकर मार्गावर मोठी गर्दी उसळली होती. मिरवणूक लालबाग येथे आल्यानंतर उड्डाणपुलाखालील शोभेच्या कलाकृतींची नासधूस करण्यात आली. हे युवक पोलिसांनाही जुमानत नव्हते. हुल्लडबाज युवकांमुळे गणपतीचे स्वागत करण्यासाठी सहकुटुंब आलेल्या भक्तांना नाहक त्रास सहन करावा लागला.

चिंतामणी गणपतीची मिरवणूक लालबाग येथे आल्यानंतर काही तरूणांनी हुल्लडबाजी करण्यास सुरूवात केली. या तरूणांनी पोलीस गणवेशातील पुतळाही तोडला. काहींनी बेस्ट बस आणि टॅक्सीच्या टपावर चढून नाच केला. दरम्यान, गोंधळ घालणारे युवक हे बाहेरचे होते, असे सांगत चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दिलगिरी व्यक्त केली. मंडळाने सर्व ती काळजी घेतली होती. कार्यकर्त्यांचा फौजफाटा ही तैनात होते. परंतु, बाहेरली युवकांनी हा गोंधळ घातला, असे मंडळाचे पदाधिकारी म्हणाले.