परवानगीविनाच सार्वजनिक ठिकाणी खड्डे खोदून रस्त्याची दुर्दशा करणाऱ्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह ४० मंडळांवर पालिकेने दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे.
‘लालबागच्या राजा’च्या मंडळाला पालिकेने ३.३८ लाख रुपये दंड ठोठावला आहे. ही रक्कम वेळेत न भरल्यास मंडळाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त आनंद वाघराळकर यांनी दिली. मात्र ही रक्कम येत्या दोन-तीन दिवसांमध्ये भरण्याची तयारी मंडळाने दर्शविली आहे. मंडळांना प्रतिखड्डा दोन हजार रुपये दंड आकारण्यात येतो.दरम्यान, कारवाईच्या भीतीने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी दंडाची रक्कम भरण्यासाठी पालिकेच्या एफ-दक्षिण विभाग कार्यालयात धाव घेतली होती. मात्र धनादेशाऐवजी डीडी घेऊन येण्याची सूचना अधिकाऱ्यांनी केल्यामुळे दंड न भरताच कार्यकर्त्यांना परतावे लागले.

पैसे भरण्यास मंडळ तयार
गेली काही वर्षे मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पालिका अधिकाऱ्यांबरोबर फिरून रस्त्यात खोदलेल्या खड्डय़ांची संयुक्तरीत्या पाहणी करीत आहेत. तशी ती यंदाही करण्यात आली असून नियमानुसार खड्डय़ांचे पैसे भरण्यास मंडळ तयार आहे, असे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी यांनी स्पष्ट केले.

पालिकेने परवानगी नाकारली असतानाही मंडप उभारून गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची यादी तयार करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी २४ विभाग कार्यालयांमधील साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. ही यादी तयार झाल्यानंतर संबंधित मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.