लता मंगेशकर या स्वराची साथ आयुष्यभराची सांगाती कशी राहिली, याचे अभिनेते नाना पाटेकर यांनी केलेले मुक्तचिंतन.. स्वरसम्राज्ञी लतादीदी आज नव्वदाव्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने ‘लोकसत्ता’च्या वाचकांसाठी हा खास शब्दनजराणा.

कांही आठवायचं म्हणून आठवत राहतं,

out there screaming book
बुकबातमी: ‘भयप्रेमीं’साठीचा दस्तावेज..
ncert book latest news
बाबरी मशीद, गुजरात दंगली, हिंदुत्वाचे संदर्भ हटवले; NCERT च्या पुस्तकामधील मजकुरात बदल!
Kennedy novel Marathi short stories Ram Kolarkaran editing magazines
कथावार्ता: कॅनडी नवलघुकथा..
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?

कांही विसरायचं म्हणून आठवत राहतं.

सहावीच्या वर्गातला मित्र भेटतो, बत्तीस वर्षांनी.

‘आम्ही तुला नेहमी पाहतो. पण इतक्या वर्षांनी तू मला ओळखू शकणार नाहीस!’

डोळ्याला डोळे भिडतात.

आठवणींची सावरी पिंजली जाते.

बत्तीस वर्षांत निसर्गाने त्याच्यावर मनमुराद कलाकुसर केलेली असते.

अभावितपणे तोंडातून चार अक्षरं ओघळतात.

‘शिवराम’

तो रस्त्यात मिठी मारतो.

त्याच्या आनंदाला थर्मामीटर लावता येत नाही.

डोळे घागरतात.

म्हणतो,

‘भडविच्या, शाळेत इतकं लक्षात ठेवलं असतंस तर शिकून चांगली नोकरी नसती केलीस, हजार बाराशेची! नट झालाय, रांडेचा!’

शिवराम कोकणातला.

एकच शिवी तो पुन्हा वापरीत नाही.

कोकणात शिवीची ओवी होत असते.

मला मात्र असं असं झालेलं असतं.

 

एखादी गोष्ट आठवली नाही की माझा गिरमीट होतो.

प्रेतयात्रेला गेलो असतांना कसा कोण जाणे डोक्यात विचार आला..

‘वेस्ट इंडिजच्या अमुक सालच्या टीममध्ये तो अमुक होता त्याचं नाव काय बरं?’

भुंगा होतो.

स्मशानात मी उत्साही असतो.

प्रेत सरणावर ठेवतो. परंतु डोक्यातला तो अमुक जात नाही.

चिता पेटते आणि सावरीमधली म्हातारी डोळ्यासमोर तरंगते.

मी स्वत:शीच कुजबुजतो.

‘सेमुर नर्स!’

बाजूचे कान माझ्याकडे वळतात.

धुरानं डोळे चुरचुरल्यामुळे रडल्या सारखं करतात.

चितेवर विरघळणाऱ्या मित्राला मी नमस्कार करतो आणि त्या गर्दीतून मला खोडतो.

पैशांची गोळाबेरीज इकडे तिकडे झाली. काही वाटत नाही.

माणसं आयुष्यातून वजा व्हायला लागली की उणउण वाटायला लागतं.

स्मशानाबाहेर येऊन ओला श्वास घेतो.

निघतो.

 

बालपण!

आंबट चिंचेवरचं गाभुळलेलं बोटूक.

सगळं चोरून नेलं कुणी हरकत नाही.

पण माझा हा गाभुळगाभा कुणी चोरू नये.

 

चार नंबरच्या शाळेतला लाकडांच्या पट्टय़ांच्या चौकटीची भिंत असलेला कल्लोळ वर्ग, खेकसत कानांची कडबोळी करणारे पतंगे गुरुजींचे हात. लहानपणी वाटायचं, पतंगे गुरुजी एकलव्य असायला हवेत आणि मी द्रोणाचार्य. मग मी पतंगे गुरुजींच्या दोन्ही हातांचे अंगठे कापून घेईन, गुरुदक्षिणा म्हणून. मग त्यांना माझे कान खुडता यायचे नाहीत. माझं वाटणं दिवास्वप्न होतं. गुरुजी माझे कान ओढतच राहिले.

गुरुजी दोनच गोष्टी ओढायचे.

एक विडी आणि दुसरे कान.

माझ्या कर्णाना कवच नसल्यामुळे त्यांनी त्यांचे कानवळे करून टाकले होते.

द्रोणाचार्याचं अंगठा प्रकरण आमच्या वेळेपर्यंत अंगठे धरण्यापुरतं मर्यादित होत आलं होतं, हे आमचं नशीब,

असो!

तर कान खुडणाऱ्या पतंगे गुरुजींचं खेकसणं.

खोबरी अंब्यावर दगड मारल्यानंतरची अण्णा खोतांची अस्सल कोकणी ओवी, इदग्या खालच्या करवंदीच्या जाळ्यांमधली सरडय़ांची सरसर,

चिटकुर, गोविंदकाटकी पक्ष्यांच्या चित्रविचित्र शिटय़ा,

बाबा कारभारीच्या बुरमाच्या गाडीची खडखड,

समुद्रकिनारी वाळूच्या साबुदाण्यांची रांगोळी काढणाऱ्या चिमाटय़ा चिंबोऱ्यांची चिनाटी भीरभीर,

गजा भायदेच्या विहिरीतील कासवाची बुळुक बुळुक,

खारकुंडीचा, सुकल्या पानांशी चाललेला लेझीम,

खातूभाईंची ‘काय रे गन्या!’ म्हणून मारलेली हाळी,

अण्णा दांडेकरांचा तबला,

किराणा मालाच्या दुकानात, मेंथॉलच्या काळ्या पांढऱ्या गोळ्यांच्या बरणी पलीकडे, इठ्ठला// इठ्ठला// करणारा चंदनटीळी बाबा मानकरांचा जप,

गिनीज बुकमध्ये समावेश होऊ शकेल इतकी शिवीसंपदा असणाऱ्या गजा लोटकरची सततची उजळणी,

आणि

समुद्राची अखंड गाज.

या साऱ्याचा संमिश्र रव-सारव असायचा कानाला.

सारं बालपण कसं नादात गेलेलं असत,

आठवणींनी गच्च.

भलथोरलं बोचकं.

 

मोठं व्हायला लागतो आणि हे बोचकं आक्रसायला लागतं.

 

निवडुंगावरचं घर.

न आठवल्यासारखं जगतो.

पाठीला कुणी विचारीत नाही की, घरी परत केव्हा येणार.

ऐकू नयेत असे आवाज कान विटाळत राहतात.

भूक, उपहास, अवहेलनेचं हे मोठेपण वागवतांना सगळं विसरावंसं वाटतं,

कुणाची तरी सोबत हवीशी वाटते.

डोक्या-पाठीवरून कुणी तरी हात फिरवावा, जवळ घ्यावं,

डोळ्यात समुद्र पाहुणा आला तर त्याची ऊठबस करावी,

असं काही तरी मूक मूक वाटत असतांना,

‘तो’

येतो.

आणि

मला, सारं देतो.

सारं!

माझी आई,

प्रेयसी,

मित्र,

पायातल्या काटय़ाचा बोच,

कानाची पेटी वाजवणारे पतंगे गुरुजींचे हात,

सारं!

हरवलेलं सारं देतो.

 

कधी तो समुद्राची गाज होतो,

कधी आत्मज्ञान,

कधी आई,

कधी मित्र,

कधी मूल,

कधी मंत्र,

कधी गाय होऊन हंबरतो,

कधी माय हाऊन गोंजारतो,

कधी माडांची सळसळ,

कधी इदग्यावरची अजान,

कधी मातीवर मुताचा साप काढणाऱ्या बैलाच्या गळ्यातील घंटा,

तर कधी

ज्ञानेश्वराचा मुका,

साखरझोपेतल्या तृणाला जाग आणणारा दवाचा थेंब,

पाठीवरचा वडिलांचा हात,

सोसाटय़ाचा वारा,

जखमेवरची फुंकर,

ओंकार,

कधी नाथ,

कधी आदिनाथ!

 

‘तो’

मला सावरतो.

मला आत्मविश्वास देतो.

प्रेम करायला शिकवतो.

मला सुंदर बनवतो.

माझ्या आनंदाची तो दिवाळी होतो.

काजळरात्रीचा कवडसा होतो.

वाळल्या हसूच्या पुन्हा लाह्य़ा करतो,

मावळतीला उदयाचे रंग चुरतो,

श्रावणसरींवर उन्हाची साय धरतो,

माझ्या बैदुलांमधली नक्षी होतो,

माझ्या अवकाशाला सवाष्ण करतो,

आईच्या पुढय़ातला भांग पाडणारा माझा चिमूट चेहरा मला पुन्हा गवसतो,

आतल्या रिकाम्या घरात कुणी तरी राह्य़ला येतं.

 

‘तो’

माझ्या जवळ,

माझ्यात राहतो.

माझ्यातला मी होतो.

 

देवानं सृष्टी निर्माण केली,

तरीसुद्धा देवापाशी सृष्टीच्या प्रत्येक अंगाचा अंश उरला.

‘याचं काय करू?’

मग देवानं त्यापासून

‘तो’

घडवला,

आणि जपण्यासाठी

‘ती’

च्याजवळ दिला.

‘ती’

न देवाची ठेव म्हणून

आपल्या कंठात जिवापाड जपला.

कृष्ण-मीरेसारखे ते अ-भंग राहिले.

माझ्या साऱ्या भल्याबुऱ्या आठवणींचे त्यांनी अभंग केले.

‘तो’

दैवी स्वर,

आणि त्याची

‘ती’

माय

लतादीदी!

 

माझ्या उणेपणाच्या नाभीला फुटलेल्या बांडगुळावर ती ब्रह्म होऊन बसते

ही माझी रखमाय माझ्यासाठी मोत्याच्या चुऱ्यात दूध कुस्करते,

आत कुठं तरी गाभाऱ्यात कृष्ण गोंदवते,

आणि

मी थेंब थेंब होतो.

‘ती’च्या नादब्रह्मासमोर

नतमस्तक होण्याशिवाय मी दुसरं काय करणार?