गेल्या पाच दशकांहून अधिक काळ रसिकांच्या कानांना तृप्त करणाऱ्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गीतांचे संकलनरूपी पुस्तक नव्या वर्षांत प्रकाशित होणार आहे. लतादीदींनी लिहिलेली गाणी हे या संकलनाचे वैशिष्टय़. हरकती, मुरक्या आणि स्वरोच्चारांसाठी लतादीदींनी कागदावर केलेल्या खुणा हे या पुस्तकाचे वेगळेपण आहे.
गेल्या पन्नास वर्षांत रसिकांच्या पसंतीस उतरलेली अजरामर गाणी पुस्तकात असणार आहेत. दीदींच्या चार हजार लोकप्रिय गाण्यांपकी तीनशे निवडक गाणी संकलनासाठी निवडण्यात आली आहेत. गाताना सुरांच्या हरकती आणि मुरक्या घेताना सोयीचे व्हावे म्हणून लतादीदी गाण्याच्या कागदावर योग्य ठिकाणी काही खुणा करत असत. स्वत:कडचा हा अनमोल खजिना दिदींनी सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. त्यांतली काही निवडक, अविस्मरणीय गाणी तशीच्या तशी स्कॅन करून त्यांचं एक देखणं आणि दिमाखदार संकलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
हिदी सिनेमाच्या सुवर्णयुगाची आठवण करून देणारी ‘आयेगा आनेवाला’, ‘मोहे भूल गए सांवरिया’, ‘तेरा जाना, दिल के अरमानों का मिट जाना’, ‘तेरा मेरा प्यार अमर’, ‘लग जा गले से फिर यह हसीं रात हो न हो’, ‘अजीब दास्तां है यह’, तसेच नव्वदच्या दशकातल्या ‘दिल हूंम् हूंम् करे’ आणि ‘जिया जले’ अशा लतादीदींच्या सदाबहार गाण्यांनी नटलेले हे पुस्तक नव्या वर्षांत फेब्रुवारी महिन्यात प्रकाशित केले जाणार असल्याचे समजते.
लतादीदींचे आजवर देश-विदेशात शेकडो जाहीर कार्यक्रम झाले आहेत. या कार्यक्रमाची गाणी एका जाडसर कागदावर लिहून काढण्याची दीदींची पद्धत आहे. गाण्याची हीच पाने मूळ स्वरूपात छापली जाणार आहेत. विशेष म्हणजे गीतांची निवड खुद्द दीदींनीच केली आहे. या कामात त्यांना साहित्यिक आणि ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्र आणि दिदींच्या भाची रचना शाह साहाय्य करत आहेत. छपाई, आकृतिबंध अशा तांत्रिक बाबतींत पुस्तक सर्वागसुंदर करण्याचे राज ठाकरे यांनी ठरविले असून ते पुस्तकनिर्मितीकडे जातीने लक्ष पुरवत असल्याचे सांगण्यात येत आहे. गाण्याप्रमाणेच पुस्तकात दुर्मीळ छायाचित्रांचा अंतर्भाव असणार आहे.
हे पुस्तक म्हणजे आधुनिक काळातली ज्ञानेश्वरीच. दीदींची प्रतिभा, संगीतासाठी त्यांनी घेतलेले कष्ट आणि त्यांच्या गाण्यांना असलेले चिरंतन मूल्य या सगळ्यांचे लोभस दर्शन या पुस्तकात घडणार आहे.
राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना