News Flash

अदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा द्या; मुंबई हायकोर्टात याचिका

"अदर पूनावाला जीवाच्या भीतीपोटी भारताबाहेर असतील हे कॅप्टनविना वादळात असणाऱ्या जहाजासारखं"

संग्रहित (Photo: adarpoonawalla.com)

कोविशिल्ड लसीची निर्मिती करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टात यासंबंधी याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील दत्ता माने यांनी ही याचिका केली असून यावेळी त्यांनी अदर पूनावाला यांना लस पुरवठ्यावरुन धमकी देणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणीदेखील केली आहे.

जर लसनिर्मिती करणाऱ्यांना असुरक्षित वाटत असेल तर याचा परिणाम लसनिर्मितीवर होऊ शकतो असा दावा दत्ता माने यांनी याचिकेत केला आहे. “जर अदर पूनावाला जीवाला धोका असण्याच्या भीतीपोटी भारताबाहेर असतील तर हे वादळात कॅप्टनविना असणाऱ्या जहाजासारखं आहे,” असं त्यांनी याचिकेत म्हटलं आहे. अदर पूनावाला तसंच सीरमच्या संपत्तीचं रक्षण केलं पाहिजे अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

अदर पूनावाला यांना सुरक्षा देणार का?; संजय राऊतांनी दिलं उत्तर

अदर पूनावाला यांनी ‘द टाईम्स’ या युनायटेड किंग्डममधील वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतातील सध्याच्या स्थितीसाठी कोण जबाबदार आहे यासंदर्भात आपण भाष्य करु शकत नाही असं म्हटलं आहे. काही राज्यांचे मुख्यमंत्री व उद्योगपतींकडून लसींची मागणी करणारे धमकावणारे फोन आपल्याला येत असल्याचा खुलासा करतानाच पुनावाला यांनी सध्याच्या परिस्थितीला कोणाला जबाबदार ठरवता येईल यासंदर्भात मी कोणाचं नाव घेतलं किंवा उत्तर दिलं तर माझा शिरच्छेद केला जाईल अशी भीती व्यक्त केली आहे. याच्याच आधारे दत्ता माने यांनी कोर्टात याचिका केली आहे.

“…तर माझा शिरच्छेद केला जाईल”; अदर पुनावाला यांनी व्यक्त केली भीती

अदर पूनावाला यांना आधीच केंद्राकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून सुरक्षा देण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. दरम्यान काँग्रेसने यावर आक्षेप घेत मागितलेली नसतानाही सुरक्षा देण्यामागचं कारण काय अशी विचारणा केली आहे.

दरम्यान दत्ता माने यांनी याचिकेत आतापर्यंत झालेल्या लसीकरणाची आकडेवारी दिली आहे. तसंच आपण पुणे पोलीस आयुक्त आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे याप्रकरणी तक्रार केली असल्याचा दावा केला आहे. तसंच महाराष्ट्र सरकारने अदर पूनावाला यांच्याकडे तक्रार करण्यासाठी विनंती केली असल्याचंही म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 6, 2021 8:36 am

Web Title: lawyer moves bombay high court seeking z plus security for adar poonawalla sgy 87
Next Stories
1 लस घेण्यासाठी पहाटेपासून रांगा
2 लसीकरणाबाबत स्थायी समितीत पडसाद
3 कठोर निर्बंधांमुळे मत्स्यउद्योग अडचणीत
Just Now!
X