राष्ट्रवादी वा मनसेबरोबर युतीची चर्चा नाही; देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे अंतर्विरोधामुळेच पडेल. भाजप हे सरकार पाडण्याचे प्रयत्न करणार नाही. याउलट उर्वरित काळात सक्षम विरोधी पक्षनेता म्हणून काम करेन, अशी ग्वाही देतानाच सरकार स्थापण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस किंवा मुंबई महानगरपालिका निवडणुकीकरिता मनसेबरोबर युतीसाठी कोणत्याही पातळीवर चर्चा सुरू नसल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेतील पाचवे पुष्प गुंफताना शुक्रवारी स्पष्ट केले.

आगामी काळातील भाजपची वाटचाल, शिवसेनेने के लेली दगाबाजी, युती तुटल्यानंतरची परिस्थिती व महाविकास आघाडी सरकारची स्थापना, सरकारमधील समन्वयाचा अभाव, करोना हाताळणीत आलेले अपयश यासह अनेक मुद्द्यांवर फडणवीस यांनी विस्तृतपणे मते मांडली. सरकार पाडणे आमचे उद्दिष्ट नाही, करोना काळात जनतेच्या मदत कार्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. सरकारमधील गोंधळ, अंतर्विरोध जनतेसमोर येत आहे. आम्हाला सरकार पाडण्यात अजिबात रस नसून ते आपसातील मतभेदांमुळेच पडेल. आम्ही काहीच करणार नाही. सरकार स्थापनेसाठी आम्ही उतावीळ नाही, आमचा संयम खूप आहे. राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर सरकार स्थापन करण्याकरिता कोणतीही चर्चा सुरू नाही. सरकार अंतर्विरोधातून पडल्यास जनतेला योग्य पर्याय दिला जाईल. उर्वरित काळातही  विरोधी पक्षाची भूमिका प्रामाणिकपणे निभावणार आहे. पुढील निवडणुकीत भाजप स्वबळावर सत्तेत येईल, असा विश्वाास फडणवीस यांनी व्यक्त के ला. स्वबळावर सत्ता येत नसल्यास त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार योग्य निर्णय घेतला जाईल. राजकारणात जर-तरला अर्थ नसतो. त्यावेळच्या राजकीय परिस्थितीला अनुरूप निर्णय घ्यावा लागतो, असेही त्यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेची निवडणूकही रिपब्लिकन पक्षासह भाजपबरोबर असलेल्या अन्य छोट्या पक्षांबरोबर युती करून लढविली जाईल. मनसेबाबत मात्र आमची मते जुळत नसल्याने अजून युतीचे निश्चित ठरलेले नाही. महाराष्ट्रातील जनतेचा सन्मान व मराठी अस्मिता आम्हालाही आहे. पण राष्ट्रीय अस्मिता विसरून चालणार नाही. ती महत्त्वाची असून इतरांवर अन्याय करणे आम्हाला मान्य नाही. आमच्या भूमिकेशी व विचारसरणीशी मनसेची मते जुळली, तर विचार होऊ शकेल. पण सध्या काहीच ठरलेले नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर आणि सहाय्यक संपादक मुकुंद संगोराम यांनी फडणवीस यांच्याशी संवाद साधला तर प्रतिनिधी भक्ती बिसुरे यांनी सूत्रसंचालन के ले.

 

महाराष्ट्रातच राहण्याचेच माझे ध्येय

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील अन्य नेत्यांबरोबर आम्ही एकत्रित काम करीत आहोत. त्यामुळे मला केंद्र सरकारमध्ये मंत्री केले जाईल, अशा होत असलेल्या चर्चांना काही अर्थ नाही. मला माहीत असलेली पक्षाच्या कामकाजाची पद्धत व संकेत पाहता मी महाराष्ट्रातच राहीन आणि पुढील निवडणूक विधानसभेचीच लढवीन. माझे ध्येय महाराष्ट्रातच राहण्याचेच आहे. आम्हाला कोणती जबाबदारी द्यायची, याबाबत कोणतीही विचारणा होत नाही. पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेतात आणि कुणाला मुख्यमंत्री, मंत्री व्हायचे, की घरी पाठवायचे ते ठरवितात. पक्षाच्या सूचनेनुसार मी दिलेली जबाबदारी पार पाडीन. मी आतापर्यंत आमदार, मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेता या दिलेल्या भूमिकांशी १०० टक्के प्रामाणिक राहून काम करीत आहे. करोना काळात सरकारविरोधात काही केलेले नाही. जनतेचे प्रश्न, व्यवस्थेतील त्रुटी याविरोधात विरोधी पक्षनेता म्हणून आवाज उठवीत आहे व आपले कर्तव्य पार पाडत आहे, असे त्यांनी सांगितले.

 

मुख्यमंत्र्यांशी  आज संवाद

‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवाद मालेचा समारोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संवादाने होईल. राज्याच्या आगामी वाटचालीच्या संदर्भात मुख्यमंत्री ठाकरे हे भूमिका मांडतील. आज, शनिवारी सायंकाळी ५ वाजता हा वेबसंवाद होईल.