लोकसभा निवडणुकीच्या आधी व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून डझनभर मातब्बर नेते, पदाधिकारी भाजप-शिवसेनेत दाखल झाल्याने, काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. राष्ट्रवादीमधीलच आणखी काही नेते भाजप-सेनेच्या वाटेवर आहेत. काँग्रेसमधून  फक्त तीनच आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणुकीआधी अनेक वर्षे विधान परिषदेचे आमदार, उपसभापती राहिलेले दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे पुत्र निरंजन डावखरे आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपवासी झाले.

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, धनराज महाले, शेखर गोरे, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक वर्षे अध्यक्ष राहिलेले व राज्यमंत्रिपदाची संधी मिळालेले सचिन अहिर, आमदार दिलीप सोपल, नरेंद्र पाटील यांनी शिनसेनेचा आसरा घेतला. तर आमदार शिवेंद्र राजे भोसले, माजी मंत्री मधुकर पिचड, त्यांचे पुत्र आमदार वैभव पिचड, आमदार संदीप नाईक, राष्ट्रवादी प्रदेश महिला अध्यक्षपदी राहण्याचा मान मिळोल्या चित्रा वाघ यांनी भाजपची वाट धरली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षपद भूषविलेले व माजी राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन स्वगृही परतण्याचे सूतोवाच केले आहे.

रायगडमध्ये राष्ट्रवादी चे नेते आणि खासदार सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे व पुतण्या आमदार अवधूत तटकरे यांनी गुरुवारी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन राजकीय वाट बदलण्याचे संकेत दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुलनेत काँग्रेसमधून बाहेर पडणाऱ्या नेत्यांची संख्या कमी आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे-पाटील भाजपमध्ये गेले. अलीकडेच कालिदास कोळंबकर व निर्मला गावित या काँग्रेस आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेल्या गळतीसंदर्भात बोलताना पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, ज्यांना पुन्हा निवडून येण्याची खात्री वाटत नाही ते पक्ष सोडून जात आहेत, काहींना आमिष दाखविले जात आहे.