राज्यात कमी चाचण्यांमुळेच सातत्याने करोना संसर्ग वाढत असून मृत्यूचे प्रमाण सुद्धा अधिक आहे, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

करोना चाचण्या सातत्याने कमी करण्यामुळे आपण काय कमाविले आणि काय गमाविले?, असा सवाल त्यांनी  केला आहे. महाराष्ट्रातील संसर्गाचा दर अगदी प्रारंभी जो ६ ते ७ टक्के होता, तो ८ जूनपर्यंत १७—१८ टक्कय़ांवर आला आणि आता २३ ते २४ टक्के झाला आहे. मुंबईचा संसर्गाचा दर सातत्याने २१ ते २७ टक्कय़ांवर स्थिरावलेला आहे. चाचण्यांची संख्या अतिशय कमी आहे. १ ते १९ जुलैच्या दरम्यानची सरासरी काढली तरी केवळ ५५०० चाचण्या दररोज होत आहेत. महाराष्ट्र आणि मुंबईतील करोनाबळींची संख्या दररोज सरासरी एवढीच रहात आहे, असे ते म्हणाले. नवी दिल्लीतील परिस्थितीत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी हस्तक्षेप केल्यानंतर आणि चाचण्यांची संख्या वाढविल्यानंतर संसर्गाचा दर ३० ते ३५ टक्कय़ांहून  ६ टक्कय़ांवर आला. बळींच्या संख्येतही घट झाली आहे. असे असले तरी करोना चाचण्यांची संख्या तरीही दररोज कायम ठेवण्यात आली आहे. मोठय़ा प्रमाणात चाचण्यांना दुसरा पर्याय नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.