नाटककार महेश एलकुंचवार यांना ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’चा ‘दिलीप वि. चित्रे स्मृतिसाहित्य जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तसेच वाशी येथील गजानन खातू यांना समाजकार्यासाठी जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

अमेरिके त स्थायिक झालेल्या मराठी माणसांनी स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’तर्फे  हे पुरस्कार दिले जातात. विज्ञानकथा वाङ्मय प्रकारासाठी सुबोध जावडेकर यांना पुरस्कार दिला जाणार आहे. किरण येले यांच्या ‘तिसरा डोळा’ या कथासंग्रहाला, प्रदीप पुरंदरे यांच्या ‘पाण्याशप्पथ’ या माहितीपर पुस्तकाला ‘ग्रंथ पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. श्याम पेठकर यांच्या ‘तेरवं’ या नाटकाला ‘रा. शं. दातार नाटय़ पुरस्कार’ मिळाला आहे. जतीन देसाई यांना ‘विशेष कृतज्ञता पुरस्कार’, चेन्नईच्या के . वीरमणी यांनी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार’, अरुणा सबाने यांना ‘कार्यकर्ता प्रबोधन पुरस्कार’, सुधीर अनवले यांना ‘कार्यकर्ता संघर्ष पुरस्कार’, चेतन साळवे यांना ‘युवा पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार आहे.

पुरस्कारांचे स्वरूप

एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे विशेष कृतज्ञता पुरस्कार, दाभोलकर स्मृती व वाङमयप्रकार पुरस्कारांचे स्वरूप आहे. ग्रंथ, नाटय़ आणि कार्यकर्ता पुरस्कारांसाठी प्रत्येकी ५० हजार रुपये, स्मृतिचिन्ह देण्यात येते. युवा पुरस्काराचे २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे स्वरूप आहे. करोना प्रादुर्भावामुळे यंदा पुरस्कार प्रदान सोहळा होणार नाही. महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्काराचे हे २७ वे वर्ष आहे. प्रत्येक पुरस्कारासाठी भारतातील समितीतर्फे  तीन नावांची शिफारस केली जाते. त्यापैकी एक नाव अमेरिकेतील समिती निश्चित करते. यापूर्वी ३३६ पुरस्कार दिले गेले आहेत. यावर्षीच्या समारंभाचे आयोजन पुण्याच्या महिला सर्वागीण उत्कर्ष मंडळ (मासूम) व साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाणार आहे.

निवड समिती 

अमेरिकेतील साहित्य व समाजकार्य पुरस्कार निवड समित्यांमध्ये सुनील देशमुख, शोभा चित्रे, विद्युलेखा अकलूजकर, शिरीष गुप्ते, शैला विद्वांस, मनीषा केळकर, अरुंधती विनोद, रजनी शेंदुरे इत्यादी सदस्य होते. तर भारतातील साहित्य पुरस्कार निवड समितीमध्ये मुकुंद टाकसाळे, आसाराम लोमटे, रमेश इंगळे-उत्रादकर, नीरजा, किशोर बेडकीहाळ, ओंकार गोवर्धन, मनस्विनी ल. र., चिन्मय केळकर हे सदस्य होते. समाजकार्य पुरस्कार २०२० च्या निवड समितीमध्ये धनाजी गुरव, सुनीती सु.र., निशिकांत भालेराव, सुषमा शर्मा, विजया चौहान, विनोद शिरसाठ, रमेश अवस्थी व मनीषा गुप्ते हे सदस्य होते.