करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र सरकारकडून ठरवून देण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करत मिरा भाईंदरच्या आमदार गीता जैन यांनी फर्निचरच्या दुकानाचे उद्घाटन केलं आहे. या घटनेनंतर त्यांच्यावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिरा-भाईंदर शहरात सध्या करोना बाधित रुग्णानाच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. त्यामुळे वाढत्या रुग्ण संख्येला आटोक्यात आणण्याकरिता महापालिका प्रशासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकानं ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. मात्र अशा परिस्थितीत ७ एप्रिल रोजी भाईंदर पूर्व परिसरातील गीता नगर या मुख्य मार्गावर ‘भक्ती डेकॉर’ या फर्निचरच्या दुकानाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.

कडक निर्बंध लागू करण्यात आलेल्या काळातच या दुकानाचे उद्घाटन मिरा भाईंदर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार गीता जैन यांच्या हस्ते करण्यात आलं. एकीकडे अत्यावश्यक दुकानांना वगळता इतर दुकानांना सक्तीने बंद करण्यात येत आहे. मात्र नियमांत नसताना देखील फर्निचरच्या दुकानाचा उद्घाटन सोहळा पार पडत असल्याने व्यापारी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात आमदार गीता जैन यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी दूरध्वनी स्वीकारला नाही.

लॉकडाउन सदृश्य निर्बंध

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत करोना संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा, तर इतर वेळेत जमावबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाउनकरण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी विरोधी बाकांवरील भाजपा, मनसेसह विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन सहकार्य करण्याचं आवाहन केलं होतं.