विविध क्षेत्रात विधायक काम करणाऱ्या नऊ दुर्गाचा सन्मान येत्या मंगळवारी, २२ ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. तर याच कार्यक्रमात निवृत्त पोलीस अधिकारी मीरां चड्ढा बोरवणकर यांना ‘लोकसत्ता दुर्गा जीनवगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाच्या नऊ दुर्गाच्या निवड समितीत जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां छाया दातार, सुप्रसिद्ध लेखिका मीना वैशंपायन आणि कार्यकर्त्यां सुप्रिया जान सोनार यांचा सहभाग होता.

सामाजिक बदलांसाठी ठामपणे उभ्या राहणाऱ्या आणि विविध क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या नऊ दुर्गाना ‘लोकसत्ता दुर्गा’ उपक्रमाद्वारे गौरवण्यात येते. नवरात्रीचे नऊ दिवस या दुर्गाची माहिती ‘लोकसत्ता’मधून प्रसिद्ध करण्यात येते. या उपक्रमाचा यंदाचा सन्मान सोहळा मंगळवारी सायंकाळी ६.१५ मिनिटांनी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात रंगणार आहे. वंचित मुलांसाठी ‘ज्ञानदेवी’ ही संस्था काढून हजारो मुलांसाठी आधारवड बनलेल्या डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे, मेळघाट येथे राहून आदिवासींच्या डोळ्यांवर उपचार करणाऱ्या डॉ. कविता सातव, विविध सामाजिक संस्थांना दानशूर लोकांपर्यंत पोहोचवून कोटय़वधी रुपयांचे दान मिळवून देणाऱ्या वीणा गोखले, वाळू माफियांना रोखणाऱ्या तडफदार तहसीलदार शिल्पा ठोकडे, लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांना मानसिक वेदनेतून बाहेर काढण्यासाठी यशस्वी शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉ. मीनाक्षी नलबले – भोसले, समाजातील कुप्रथा, बुवा-बाबांची भोंदूगिरी आणि जातपंचायतींच्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या अ‍ॅड्. रंजना गवांदे, अनेक विक्रम करणाऱ्या जलतरणपटू ‘सागरकन्या’ रूपाली रेपाळे, एचआयव्ही-एड्सग्रस्त मुलांच्या आई झालेल्या मंगलताई शहा आणि मतिमंद मुलांसाठी ‘घरकुल’ थाटणाऱ्या नंदिनी बर्वे यांना या सोहळ्यात दुर्गा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या सन्मान सोहळ्यात कवी सौमित्र, मिताली विंचूरकर, मेघा राऊत, कौशिकी जोगळेकर, दसक्कर भगिनी आणि ‘संगीत देवभाबळी’ फेम मानसी जोशी आणि शुभांगी सदावर्ते आदींचा सहभाग असलेली साहित्य, संगीताची बहारदार मैफलही अनुभवता येणार आहे. कार्यक्रमाला प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रवेश मिळेल.

परीक्षक मंडळ..

यंदाच्या दुर्गाची निवड ही ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां छाया दातार, ‘एशियाटिक सोसायटी ऑफ इंडिया’च्या मानद अध्यक्ष डॉ.मीना वैशंपायन आणि ‘राइट टू पी’ कार्यकर्त्यां सुप्रिया जान-सोनार यांच्या निवड समितीने केली आहे. दुर्गा पुरस्कारासाठी लोकसत्तेच्या वाचकांकडून ४७५ जणींची नामांकने आली होती. त्यातून यंदाच्या ९ दुर्गाची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रायोजक

-: प्रस्तुतकर्ते :-ग्रॅव्हिटस फाऊंडेशन

-: सहप्रायोजक :-एन के जी एस बी को-ऑप. बँक लि. आणि व्ही. पी. बेडेकर अ‍ॅण्ड सन्स

-: पॉवर्ड बाय :-व्ही. एम. मुसळूणकर अ‍ॅण्ड

सन्स ज्वेलर्स प्रा. लि.,

राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टलिाइजर्स लि.

पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि., डेंटेक,

इंडियन ऑइल, कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ)

टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा