‘म्हाडा’ मुख्यालयात कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रम

मंत्रालयीन कर्मचारी आणि महापालिका कर्मचाऱ्यांनंतर आता जनसामान्यांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण अर्थात म्हाडा कर्मचाऱ्यांसाठी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या गुंतवणूकविषयक मार्गदर्शनाचा कार्यक्रम येत्या बुधवारी, २३ जानेवारीला दुपारी ३ वाजता होत आहे. गृहनिर्माणात कार्यरत कर्मचारी आणि अधिकारी वर्गासाठी यानिमित्ताने गुंतवणुकीतून संपत्तीनिर्माणाचे मर्म उलगडले जाणार आहे.

म्युच्युअल फंडविषयक जनजागृती करणाऱ्या ‘म्युच्युअल फंड सही आहे’ प्रस्तुत आणि ‘लोकसत्ता’ पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमाची ‘सीडीएसएल’ ही डिपॉझिटरी सेवा सहप्रायोजक आहे. वांद्रेस्थित म्हाडा मुख्यालयाच्या इमारतीतील तळमजल्यावरील कॅन्टीनमध्ये हा कार्यक्रम होत आहे. हा कार्यक्रम पूर्णपणे विनामूल्य असून केवळ गुंतवणूकदार साक्षरतेच्या ध्यासाने योजण्यात आला आहे.

महागाईच्या वेगाशी वेतनवाढीचा वेग स्पर्धा करू शकत नसला तरी उपलब्ध उत्पन्न व खर्च यांचा मेळ राखताना अधिकाधिक बचत आणि नियोजनबद्ध गुंतवणूक आर्थिक संकटावर मात करणारी ठरू शकते. जीवन सुखमय बनविण्यासाठी मनाशी बाळगलेली स्वप्ने पूर्ण करण्याचा गुंतवणूक हाच एक सशक्त मार्ग आहे. त्यासाठी आवश्यक संयम, सातत्य आणि आर्थिक शिस्त यावर बेतलेल्या आर्थिक नियोजनाचे काही कानमंत्र यानिमित्ताने तज्ज्ञांकडून दिले जातील.

म्युच्युअल फंड उद्योगाची संघटना ‘अ‍ॅम्फी’चे पदाधिकारी आणि रिलायन्स म्युच्युअल फंडाचे विपणन प्रमुख संदीप वाळुंज हे ‘म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे फायदे’ उलगडून सांगतील, तर ‘सीडीएसएल’चे आर्थिक साक्षरता विभाग प्रमुख अजित मंजुरे हे ‘डीमॅटचे लाभ’ विशद करतील. म्युच्युअल फंड आणि समभाग गुंतवणुकीची परतावा कामगिरी, आर्थिक स्वप्नपूर्तीसाठी या पर्यायांचा सुयोग्य वापर, त्यातील जोखीम घटक आणि कर कार्यक्षमतेचे लाभही यानिमित्ताने दोहोंकडून सांगितले जातील. उपस्थितांना आपले गुंतवणूकविषयक प्रश्न आणि शंकाही यानिमित्ताने या दोन तज्ज्ञांना थेट विचारता येतील.