‘बदलता महाराष्ट्र’मधील चर्चासत्रांतील सूर
वेगळ्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या महिलांच्या क्षमतांबाबत आजही साशंकताच बाळगली जात असून त्यामुळे त्यांना या अदृश्य कसोटीवर आपल्या उत्तम कामगिरीने एकदाच नव्हे तर वारंवार उत्तीर्ण व्हावे लागते, असा सूर ‘बदलता महाराष्ट्र’च्या ‘कर्ती आणि करविती’ या ‘जागतिक महिला दिना’निमित्त आयोजित विशेष परिषदेत बुधवारी मान्यवर महिला वक्त्यांनी व्यक्त केला.


‘आपल्या कामाने बदल आणण्याकरिता धडपडणारी, स्वतंत्र विचार करणारी स्त्री काही अपवाद वगळता समाज स्वीकारतो आहे. महाराष्ट्रात तर इतर राज्यांच्या तुलनेत खूपच सकारात्मक वातावरण आहे,’ अशा शब्दांत उद्घाटनप्रसंगी भाषण करताना संवेदनशील अभिनेत्री मुक्ता बर्वे हिने या दोन दिवसांच्या परिषदेची दिशा अधोरेखित केली. ‘एके काळी सामान्य चेहऱ्याची मुलगी म्हणून माझा अभिनय आवडूनही नायिकेची भूमिका मला नाकारण्यात आली होती. परंतु, गेल्या १५ वर्षांत माझ्यासारख्या सामान्य दिसणाऱ्या अभिनेत्रीला प्रेक्षकांनी स्वीकारले. तिच्या अभिनयाचे, कामाचे कौतुक केले. मी दिवसेंदिवस छान दिसू लागले आहे, अशी आता माझी कुणी स्तुती करतं तेव्हा ते ‘छान दिसणं’ खरे तर माझ्या कामातून आलेल्या समाधानातून आणि आत्मविश्वासातून असल्याचं मला जाणवतं,’ अशा सहज शब्दांत मुक्ता हिने समाजात होणारा बदल मांडला. इतर वक्त्यांनीही कमी-अधिक प्रमाणात सहकाऱ्यांकडून, घरच्यांकडून नेहमी प्रोत्साहनच मिळत गेले. इतकेच नव्हे तर यामुळे समोर आलेले संघर्षांचे अनेक प्रसंग आपण निभावून नेऊ शकलो, याचा आवर्जून उल्लेख केला.
‘प्रशासनातील स्त्री’ या पहिल्या सत्रात महिलांना संधी सहजपणे मिळाली तरी स्वत:च्या कामातून सिद्ध करण्याचे आव्हान सतत कसे पेलावे लागते, हे आपल्या अनुभवातून वक्त्यांनी सांगितले. प्रशिक्षणाने व्यवस्थापनाचे किंवा तत्सम कौशल्य आत्मसात करून महिला हे आव्हान पेलू शकतात. त्यात महिला म्हणून त्यांचे जे काही गुण असतात त्यांचा कामाच्या ठिकाणी ‘सॉफ्ट स्कील’ म्हणून कसा उपयोग होतो, हे नेमकेपणाने नमूद झाले.
‘एक‘तिचा’ लढा’ या दुसऱ्या सत्रात अपरिहार्य परिस्थितीमुळे करिअरला नव्याने सुरुवात करावी लागल्यानंतर उद्भवलेल्या संघर्षांच्या कथांनी उपस्थितांना प्रेरणा दिली. आत्मविश्वास न गमावता आणि आपल्या मूल्यांपासून न ढळता हा लढा कसा यशस्वी करता येतो, हे वैयक्तिक अनुभवातून उलगडण्यात आले. त्यात वैयक्तिक न्याय हक्कांकरिता मुस्लीम महिलांबरोबरच समाजातील पददलित महिलांच्या सुरू असलेल्या लढय़ाची जाणीवही उपस्थितांना झाली.
‘अग्निपरीक्षा-आणखी किती?’ या सत्रात इतरांच्या टोमण्यांमुळे होणाऱ्या त्रासाला मनोबलाच्या आधारे तोंड देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. महिलांनी ‘सुपर वुमन’ असल्याचे सिद्ध करण्याच्या अट्टहासापोटी निकोप मनाने केलेली मदत स्वीकारतानाही संकोच बाळगला जातो. त्याचा त्रास त्यांनाच होतो, हे सत्रातील चर्चेत नेमकेपणाने मांडले गेले.
या परिषदेच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करताना ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी महिलांच्या संदर्भातील पारंपरिक भूमिका आणि विचार तोडूनमोडून टाकण्याची गरज व्यक्त केली. या वैचारिक घर्षणामुळे अनेकांच्या भावनांना तडे जातील. परंतु, ते झाल्याशिवाय महिला सक्षमीकरणाच्या खऱ्या मुद्दय़ांना हात घालला जाणार नाही, हे त्यांनी या वेळी नमूद केले.

महाराष्ट्र कन्या!
आपण ‘महाराष्ट्राच्या कन्या’ असल्याचा अभिमान अनेक वक्त्यांनी व्यक्त केला. इतर राज्यांच्या तुलनेत इथले वातावरण निश्चित पुढारलेले आहे, असे मुक्ता बर्वे हिने सांगितले. तर महिला म्हणून जन्म घ्यायचा असेल तर महाराष्ट्रात घ्यावा, अशा शब्दांत मनीषा म्हैसकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शुभांगी गोखले, सोनाली कुलकर्णी यांनीही महाराष्ट्रात असल्याने आपल्याला अनेक गोष्टी सहजसाध्य झाल्याचे नमूद केले.

टीजेएसबी सहकारी बँक लि. प्रस्तुत लोकसत्ता बदलता महाराष्ट्र,
सहप्रायोजक एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर्स डेव्हलपर्स लि., टेलिव्हिजन पार्टनर ‘झी २४ तास’.