स्वातंत्र्य आणि शिक्षण झगडून मिळवणाऱ्या आजच्या स्त्रीने घरातील ‘कर्ती आणि करविती’चा मान मिळवला आहे. मात्र, स्त्री-शिक्षणाच्या चळवळीपासून ते ३३ टक्के आरक्षणाची मागणी करण्याएवढय़ा खंबीर, वैचारिक आणि आर्थिकदृष्टय़ा सक्षम झालेल्या स्त्रियांना अजूनही ‘कर्ती’चा सन्मान मिळाला आहे का, याचा ऊहापोह ‘कर्ती आणि करविती’ या उपक्रमात केला जाणार आहे.
‘लोकसत्ता’ आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाचे आठवे पर्व ‘कर्ती आणि करविती’ या विषयाभोवती गुंफले गेले आहे. ९ आणि १० मार्चला होत असलेल्या या परिषदेत बदलत गेलेल्या स्त्रीविश्वाचा वेगवेगळ्या बाजूंनी वेध घेतला जाणार आहे. आपल्या आवडीचे शिक्षण घेणारी, नोकरी-व्यवसाय, जोडीदार, फॅ शन, राजकीय-सामाजिक विचारसरणी, आर्थिक व्यवहार अशा प्रत्येक गोष्टीची आपल्या आवडीनुसार निवड करणारी आजची स्त्री नेमकी कशी आहे? आपापल्या क्षेत्रात सर्वोत्तम राहणे आणि कुटुंबाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळणे हे समतोलाचे समीकरण आजही तिला जपावे लागते आहे. मात्र हे सगळे करत असताना ‘सुपरवुमन’ची खोटी झूल टाकून देऊन व्यावहारिकपणे तिने कोणते पर्याय शोधले आहेत, अशा अनेक प्रश्नांची वास्तववादी उत्तरे विविध विषयांच्या माध्यमातून दोन दिवसांच्या या परिषदेत मिळणार आहेत.
टीजेएसबी सहकारी बँक लि. प्रस्तुत ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’, सहप्रायोजक एमईपी इन्फ्रास्ट्रक्चर्स डेव्हलपर्स लि., टेलिव्हिजन पार्टनर ‘झी २४ तास’.