‘अग्निपरीक्षा आणखी किती?’ सत्रात मान्यवरांचा सूर
स्त्रीला आजही स्वत:ची क्षमता सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा द्यावी लागते. मग ती केवळ चारित्र्याच्या पातळीवर नव्हे, तर प्रत्येक छोटय़ा छोटय़ा गोष्टींसाठी तिला स्वत:ला सिद्ध करावे लागते. आरक्षण ही त्यामुळे महिलांसाठी मोठी जबाबदारी ठरते. आरक्षण घेऊन पदावर आलेली महिला यशस्वी न ठरल्यास तो स्त्री-शक्तीचा अपमान समजला जातो. मात्र, या विचारांना बळी न पडता आपल्याला कुठल्या क्षेत्रात काय करायचे आहे हे ठरवून प्रामाणिकपणे, धीराने स्त्रियांनी आपले काम करत पुढे जात राहिले पाहिजे, असा विचार ‘अग्निपरीक्षा आणखी किती?’ या परिसंवादात सहभागी झालेल्या वक्त्यांनी मांडला .
स्वत:ला सिद्ध करण्याच्या नादात ‘सुपरवुमन’ ठरण्याच्या प्रलोभनापासून स्त्रियांनी दूर राहिले पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन सोनाली कुलकर्णी हिने केले. परिसंवादाचे सूत्रसंचालन वैशाली चिटणीस यांनी केले.

केवळ चारित्र्याच्या संबंधातच अग्निपरीक्षेला तोंड द्यावे लागत नसून शनिचौथऱ्यावरील प्रवेशासारख्या स्त्री-स्वातंत्र्याच्या संदर्भातील मुद्दय़ांवर भूमिका घेतानाही त्यांना त्रास होतो. महिलांना त्यांची भूमिका वठवण्याची संधी दिली पाहिजे.
– नीला लिमये, सरचिटणीस, ‘महाराष्ट्र महिला परिषद’

स्त्रीचे स्वप्न मोठे होण्याचे नसते. चांगले काम करण्याचे असते. सध्या तिच्या मनाच्या धावपट्टीवर आव्हानांचा, कामांचा भडिमार होतो आहे. या ओढाताणीचा परिणाम अंतिमत: त्यांच्या प्रकृतीवर होत असेल तर त्याचा स्त्रियांनी गांभीर्याने विचार करायला हवा.
– सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री

पदावर असताना पुरुषांबरोबरच महिलाही आपले पाय खेचत असतात. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी सकारात्मक वृत्ती आणि खंबीर मनोबलानेच स्त्रियांनी वावरले पाहिजे. तरच या परिस्थितीतून त्या सहज बाहेर पडू शकतील.
– शुभा राऊळ, माजी महापौर