News Flash

‘ती’च्या कर्तृत्वाचा अविस्मरणीय मेळावा!

सकाळी साडेदहापासून सुरू झालेल्या या परिसंवादासाठी निमंत्रित महिलांनी पावणेदहापासूनच उपस्थिती लावली होती.

  पहिल्या सत्रानंतर ओएनजीसीतील अग्निशमन अभियंता हर्षिनी कान्हेकर, अभिनेत्री मुक्ता बर्वे आणि पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर सेल्फी घेताना.  

‘बदलता महाराष्ट्र’च्या निमित्ताने विविध क्षेत्रांतील स्त्रियांचा संवाद

साहित्य-सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच राजकीय कार्यक्रमांचे साक्षीदार असलेले यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमधील ‘रंगस्वर’ सभागृह बुधवारच्या सकाळी एका वेगळ्याच उत्साहाने भारलेले होते. निमित्त होते टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ या कार्यक्रमाचे! या कार्यक्रमात या वेळी ‘कर्ती आणि करविती’ या शीर्षकाखाली ‘स्त्रियांच्या समस्या, त्यांच्यापुढील आव्हाने’ हा विषय घेण्यात आला. या परिसंवादाच्या पहिल्याच दिवशी समाजातील विविध क्षेत्रांतील महिलांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवला. सकाळी साडेदहापासून सुरू झालेल्या या परिसंवादासाठी निमंत्रित महिलांनी पावणेदहापासूनच उपस्थिती लावली होती.

या परिसंवादाच्या पहिल्या सत्रात सहभागी होणाऱ्या वक्त्या आणि पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर तसेच ओएनजीसीच्या अग्निशमन अभियंता हर्षिणी कान्हेकर या दोघीही गणवेशात असल्याने उपस्थित महिला तसेच तरुणींमध्ये त्यांच्याबद्दलचे कुतूहल दिसत होते. कार्यक्रम सुरू होण्याआधीपासूनच या दोघींशी संवाद साधण्यासाठी खास करून तरुणींनी गर्दी केली होती. कार्यक्रमाला शोभा आली ती, कार्यक्रमाच्या उद्घाटक आणि अभिनेत्री-नाटय़निर्माती मुक्ता बर्वे यांचे आगमन झाल्यावर!

आपल्या आतापर्यंतच्या कारकीर्दीतील अनुभवांची सुरेख शब्दरंगावली मांडत मुक्ता बर्वे यांनी उद्घाटनाचे भाषण केले. समाजात बदल होत असून मुंबईसारख्या शहरात तर गेल्या १५ वर्षांत तो नक्कीच जाणवत आहे. बदलाचा हा वेग ग्रामीण भागांत थोडा कमी असला, तरी परिस्थिती बदलली आहे. हे स्वागतार्ह असल्याचे मुक्ता बर्वे यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यांच्या या आणि अशा विचारांना उपस्थित श्रोत्यांनीही मुक्तपणे दाद दिली.

उद्घाटनाच्या सत्रानंतर चहापानाच्या वेळी श्रोत्यांनी मुक्ता यांना गराडा घालत आपल्या मनातले असंख्य प्रश्न विचारले. मुक्ता यांनीही प्रत्येकीच्या प्रश्नांची दखल घेत स्मितहास्य करत उत्तरे दिली. त्यानंतर मग अनेकींनी मुक्ता यांच्यासह सेल्फीही काढले. त्यानंतर झालेल्या पहिल्या सत्रात नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू वसुधा कामत, रश्मी करंदीकर आणि हर्षिणी कान्हेकर यांनी ‘प्रशासनातील ती’चा प्रवास उलगडला. या चौघींच्या संघर्षांच्या कहाणीला श्रोत्यांनी कधी टाळ्यांची, तर कधी मूक दाद दिली. या सत्रानंतरही या चारही वक्त्यांकडून आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी श्रोत्यांनी गर्दी केली.

त्यापुढील सत्रात शुभांगी गोखले, सुपरमॉडेल अ‍ॅलिशिया राऊत आणि मुस्लीम महिला आंदोलन कार्यकर्त्यां नूरजहाँ साफिया नियाज यांनी ‘एक‘तिचा’ लढा’ उलगडला. तर दिवसातील तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रात माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, महिला राजसत्ताक आंदोलनाच्या कार्यकर्त्यां नीला लिमये आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी ‘अग्निपरीक्षा : आणखी किती?’ या विषयावरील आपली परखड मते मांडली. या दोन्ही सत्रांदरम्यान श्रोत्यांनीही या वक्त्यांना प्रश्न विचारल्याने संवादाचा कार्यक्रमही उत्तमरीत्या पार पडला.

लोकसत्ता ‘बदलता महाराष्ट्र’ या कार्यक्रमासाठी टीजेएसबी सहकारी बँक लिमिटेड हे मुख्य प्रायोजक असून एमईपी इन्फ्रास्ट्रक्टर डेव्हलपर्स लिमिटेड हे सहप्रायोजक आहेत. तर झी २४ तास हे या कार्यक्रमासाठी टेलिव्हिजन पार्टनर आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 3:17 am

Web Title: loksatta badalta maharashtra program on womens day special
Next Stories
1 विकास आराखडय़ात सोसायटय़ांच्या अंतर्गत रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव!
2 प्रयोग म्हणून दिलेली जबाबदारी स्त्रियांकडून यशस्वी
3 एकटीच्या संघर्षांत घरच्यांचे पाठबळ मनोबल देणारे
Just Now!
X