बेकायदा फलकबाजीवर कारवाई करण्यास गेलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना अंधेरी (पूर्व) येथील भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करीत ठार मारण्याची धमकी दिल्याची बाब महापालिकेने शुक्रवारी अवमान याचिकेद्वारे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. न्यायालयानेही या प्रकाराची गंभीर दखल घेत पटेल यांना धारेवर धरले. तसेच या प्रकरणी सोमवारी निर्णय देण्याचे संकेत दिले आहेत.

बेकायदा फलकबाजीविरोधातील जनहित याचिकांवर शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी पालिकेच्या वतीने हा प्रकार न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आला. पालिकेने या प्रकरणी पटेल यांच्याविरोधात स्वतंत्र अवमान याचिका केली आहे. न्या. अभय ओक आणि न्या. एम. एस. सोनाक कार्यकर्त्यांनी केलेला प्रकार गंभीर आहे. त्यासाठी दिवाणी आणि फौजदारी अवमान कारवाई केली जाऊ शकते, असे स्पष्ट करीत पालिकेच्या याचिकेवर सोमवारी आदेश देण्याचे संकेत न्यायालयाने दिले.

पालिकेच्या अवमान याचिकेनुसार, अंधेरीच्या के/पूर्व प्रभागामधील पालिका मैदान आणि पदपथांवर ‘जीवनज्योती फाऊंडेशन’ने बेकायदा फलकबाजी केल्याची तक्रार करण्यात आली होती. पालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ३० आणि ३१ जानेवारीला ही तक्रार करण्यात आली होती. ‘जीवनज्योती फाऊंडेशन’ ही संस्था पटेल यांची आहे. या तक्रारीचा पाठपुरावा म्हणून के/पूर्व प्रभागाचे अधिकारी उत्तम सुरवडे, सीताराम शेळके आणि संदीप केणी यांनी या परिसराला भेट दिली. तेथे संस्थेने विनापरवाना फलकबाजी केली होती. त्यामुळे या अधिकाऱ्यांनी हे फलक उतरवण्यास सुरुवात केली. याबाबत कळल्यानंतर पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेत या अधिकाऱ्यांना आधी शिवीगाळ केली. नंतर त्यांना मारहाण करीत ठार मारण्याची धमकीही दिली.

पुणे दुर्घटनेचा तपशील मागवला

पुण्यात जाहिरात फलक कोसळून झालेल्या दुर्घटनेबाबत न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने  दुर्घटनचा तपशील पुढील सुनावणीच्या वेळी सादर करण्याचे आदेश दिले.