अंधेरीतील नवदुर्गा मित्र मंडळाचा उत्स्फूर्त सहभाग

‘लोकसत्ता ९९९-नवभक्ती, नवरात्री, नवरंग’ या कार्यक्रमाची सांगता बुधवारी अंधेरी पूर्व येथील ‘नवदुर्गा मित्र मंडळा’त झाली. अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या ‘उंबरठा’ चित्रपटातील ‘गगन सदन’ हे गाणे गायिका अर्चना गोरे यांनी आपल्या सुमधुर आवाजात सादर केले. त्यानंतर समूहनृत्य, गायन, पाककला अशा विविध कलाविष्कारांनी कार्यक्रमात रंगत आणली. मजेदार खेळांची त्याला जोड मिळाली.

फुग्यांचा लॉलीपॉप, स्ट्रॉची माळ बनवणे, खुर्चीत बसून फुगा फोडणे, स्पंजच्या साहाय्याने बाटलीत पाणी भरणे अशा विविध खेळांचा आनंद उपस्थित महिला-पुरुषांनी घेतला. यातील विजेत्यांना ‘लोकसत्ता’ आणि ‘राम बंधू’तर्फे पारितोषिके देण्यात आली. अभिनेत्री ऋजुता देशमुख हिने पाककला स्पर्धेचे परीक्षण केले. यात शिळ्या भाताच्या वडय़ा करणाऱ्या कमल गवळी यांना ‘राम बंधु’चे अरुण राणे यांच्या हस्ते प्रथम पारितोषिक देण्यात आले. सुरेखा नायर यांनी खव्यापासून वडी केली होती. त्यांना ‘राम बंधु’चे संतोष गुजर यांच्या हस्ते द्वितीय पारितोषिक देण्यात आले.

‘जिला आम्ही नेहमी टीव्हीवर बघतो त्या ऋजुता देशमुखला आज प्रत्यक्षात भेटता आले. तिने आमच्या हातचे पदार्थ चाखून त्यांची स्तुती केली हे पाहून फार छान वाटले,’ असे सुरेखा नायर म्हणाल्या. या स्पर्धेत श्वेता देशपांडे यांनी तृतीय क्रमांक तर रेणू सिकेरा यांनी चौथा क्रमांक पटकावला. या वेळी नवदुर्गा मित्र मंडळाला त्यांच्या सहभागाबद्दल ‘लोकसत्ता’तर्फे ९ हजार ९९९ रुपयांचा धनादेश देण्यात आला. या वेळी उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ‘लोकसत्ता ९९९’च्या निमित्ताने आमच्या विभागात प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम आणि स्पर्धा झाल्या. पुढच्या वर्षी पुन्हा आम्ही या कार्यक्रमात सहभागी होऊ,’ असे म्हणत मंडळाचे सचिव सतीश दुबे यांनी ‘लोकसत्ता’चे आभार मानले.

प्रायोजक

राम बंधु चकली-चिवडा मसाला प्रस्तुत ‘लोकसत्ता ९९९’चे सहप्रायोजक केसरी टूर्स, रिजेन्सी ग्रुप, कलर्स हे होते. हा कार्यक्रम एम. के. घारे ज्वेलर्स पॉवर्ड बाय होता. अपना सहकारी बँक लिमिटेड हे बँकिंग पार्टनर होते.