लेखक हा सर्जनशील असतो, तो आपले स्वतंत्र विचार आपल्या कलाकृतीतून मांडत असतो. पण जर तो एखाद्या राजकीय पक्षात गेला तर तो खुलेपणाने आपले विचार मांडू शकणार नाही. त्यामुळे लेखकाने राजकीय पक्षात जायला नको, असे मत ज्येष्ठ लेखक-गीतकार गुलजार यांनी व्यक्त केले. ‘लोकसत्ता गप्पा’ या कार्यक्रमात ते बोलत होते. सुमारे सव्वा दोन तास चाललेल्या या कार्यक्रमात त्यांनी राजकीय-सामाजिक परिस्थितीवर मार्मिक शब्दांत भाष्य केले.

आपल्या शायरीत आणि कलाकृतीत डावे विचार दिसून येतात. पण तुम्ही कधी डाव्या पक्षात गेला नाहीत याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. मी डाव्या पक्षात गेलो नाही हे त्यांच्यासाठी चांगलं झालं, अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली. प्रामाणिक आणि भ्रष्टाचारी नसलेले लोक डाव्या पक्षात आहेत, याचा मला आजही विश्वास आहे. मी जर पक्षात असतो तर ज्योती बसू यांना पंतप्रधानपद का दिले नाही, असा सवाल विचारला असता, असे ते म्हणाले.

व्हॉट्स अपवर येणाऱ्या ९० टक्के रचना या माझ्या नसतात. माझा एखादा शब्द घेतला जातो. कुणीतरी त्यात आणखी काही शब्द पेरतो.. आणि माझ्या नावावर ते फिरवलं जातं. ते कोणीतरी मला पाठवतं, असे म्हणत कृपया असं करू नका, अशी विनंती त्यांनी केली. मराठी भाषा ही २३०० वर्षे जुनी आहे. हिंदी-उर्दूही इतकी जुनी भाषा नसल्याचे ते म्हणाले.

लिखाण ही एकाकीपणाची कला आहे. पेटिंग आणि संगीतातही एकाकीपणा जाणवत नाही. कदाचित मी शायर नसतो तर एक सर्वसामान्य माणसू असलो असतो, असे म्हणत बाल साहित्य निर्मिती करणे कठीण काम असल्याचे त्यांनी सांगितले. मुलं एकाकी पडत आहेत, त्यांना वेळ द्या, असा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला. सुमारे सव्वा दोन तासांत त्यांनी कधी कधी आपल्या कविता आणि इतरांच्या चांगल्या साहित्यांचेही दाखले दिले. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी गुलजार यांची मुलाखत घेतली.