वाचकांना नेहमीच्या वृत्त व्यवहारापलीकडे जाऊन सकस विचारविश्वाची ओळख करून देणाऱ्या ‘लोकसत्ता’ने एका नव्या उपक्रमाची सुरुवात केली आहे. ‘लोकसत्ता गप्पा’ या नव्या उपक्रमातील ‘गप्पां’चे पहिले सत्र आज, शनिवारी रंगणार आहे. या पहिल्याच मैफिलीचे पुष्प ज्येष्ठ कन्नड कादंबरीकार एस. एल. भैरप्पा यांच्याशी गप्पांमधून गुंफले जाणार आहे. खास निमंत्रितांसाठी असलेल्या या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी भैरप्पांशी मुक्त संवाद साधणार आहेत.

कोणत्याही संस्कृतीला तिच्यात निर्माण होणाऱ्या साहित्य, संगीत व कलांमुळे आकार प्राप्त होत असतो. त्यामुळे या क्षेत्रांमधील दिग्गजांना आमंत्रित करून खास निमंत्रितांसह त्यांच्याशी मुक्त गप्पांचा कार्यक्रम, ही ‘लोकसत्ता गप्पा’ या नव्या उपक्रमामागील संकल्पना आहे. आपल्या कर्तृत्वाने एखाद्या क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटविलेल्या दिग्गजांचे एक व्यक्ती म्हणून असणारे भावविश्व, विविध विषयांवरील त्यांचे विचार, मते जाणून घेणे तसेच श्रोत्यांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे आदी बाबी या कार्यक्रमातून साध्य होणार आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये कन्नडच नव्हे तर मराठी वाचकांच्याही मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या भैरप्पा यांच्याशी संवाद साधण्याची संधी हा श्रोत्यांसाठीही अविस्मरणीय अनुभव ठरणार आहे.

कन्नड भाषेत साहित्यनिर्मिती करणाऱ्या भैरप्पांच्या कादंबऱ्यांचा अनुवाद मराठी व हिंदीसह इंग्रजी, उर्दू, संस्कृत, गुजराती, तेलगू आदी अनेक भाषांमध्येही झाला आहे. ‘पर्व’, ‘सार्थ’, ‘तंतु’, ‘काठ’, ‘आवरण’, ‘पारखा’, ‘जा ओलांडूनी’, ‘धर्मश्री’ आदी कादंबऱ्यांबरोबरच ‘सत्य आणि सौंदर्य’ व ‘मी का लिहितो?’ अशी वैचारिक पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत. शनिवारी होणाऱ्या गप्पांमध्ये भैरप्पांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठावर ज्येष्ठ अनुवादक उमा कुलकर्णी उपस्थित असणार आहेत. उमा कुलकर्णी यांनी भैरप्पांच्या कादंबऱ्यांचा मराठीमध्ये सरल अनुवाद केला असून त्यांना अनुवादासाठी साहित्य अकादमीसह अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.

तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक असणाऱ्या भैरप्पा यांनी भारतीय-पाश्चात्त्य तत्त्वज्ञान, कलाविचार, अभिजात संगीत व मानवी नातेसंबंधांतील गुंतागुंतीचे चित्रण त्यांच्या कादंबऱ्यांतून केले आहे. त्यांच्या कादंबऱ्यांतून कथनात्म साहित्याचा नवा बाज भारतीय साहित्यामध्ये निर्माण झाला आहे. मात्र अलीकडच्या काही वर्षांमध्ये त्यांच्या कादंबऱ्यांतून व्यक्त झालेला आशय तसेच इतिहास व सामाजिक प्रश्नांवर घेतलेल्या भूमिकेमुळे ते अनेकांच्या प्रेमाचा व वादाचाही विषय राहिले. मात्र तत्त्वज्ञानाचा अभ्यास असणाऱ्या भैरप्पा यांनी भारतीय परंपरेतील ‘खंडनमंडना’च्या वादसंवाद प्रक्रियेला त्यांच्या साहित्यातून व वेळोवेळी व्यक्त केलेल्या भूमिकांतून सुरू ठेवल्याचेच आपल्याला जाणवते. त्यामुळे प्रतिभा व वैचारिकता यांचा सुरेख मेळ असणाऱ्या भैरप्पांचे व्यक्तिमत्त्व ‘लोकसत्ता गप्पा’ उपक्रमाच्या माध्यमातून जाणून घेण्याची पर्वणी रसिकांना उपलब्ध झाली आहे. ‘केसरी’ या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत, तर हॉस्पिटॅलिटी पार्टनर ‘एकेए’ आणि टेलिव्हिजन पार्टनर ‘झी चोवीस तास’ आहे. कार्यक्रमाचे प्रक्षेपण झी चोवीस तासवर दाखविले जाणार आहे.