15 December 2019

News Flash

विद्यार्थ्यांच्या ऊर्जेला विधायक वळण

प्रचंड उत्साह आणि तेवढीच उत्सुकता अशा वातावरणात ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेच्या दुसऱ्या पर्वातील मुंबई विभागाची प्राथमिक फेरी दणक्यात पार पडली.

रत्नागिरी विभागातून यंदा कोणती एकांकिका महाअंतिम फेरीत येणार, याचा निर्णय आज, शनिवारी होणार आहे.

‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेच्या दुसऱ्या पर्वातील मुंबई विभागाची प्राथमिक फेरी जल्लोषात

प्रचंड उत्साह आणि तेवढीच उत्सुकता अशा वातावरणात ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पध्रेच्या दुसऱ्या पर्वातील मुंबई विभागाची प्राथमिक फेरी दणक्यात पार पडली. प्रभादेवीतील ‘रवींद्र नाटय़ मंदिर’च्या पु. ल. देशपांडे कला अकादमीच्या तालीम हॉलमध्ये रविवारी झालेल्या या फेरीतून अंतिम फेरीसाठी ‘एक्स-प्रीमेंट’ (म. ल. डहाणूकर महाविद्यालय), ‘सुशेगात’ (रुईया महाविद्यालय), ‘अर्बन’ (साठय़े महाविद्यालय), ‘लछमी’ (कीर्ती महाविद्यालय), ‘शिकस्ते इश्क’ (के. जे. सोमय्या महाविद्यालय) या पाच एकांकिकांची निवड करण्यात आली.
महाविद्यालयीन विद्यार्थामध्ये असलेल्या व्यापक ऊर्जेला विधायक वळण लागावे या हेतूने या स्पध्रेचे आयोजन करण्यात येते. आणि मुंबईच्या सांस्कृतिक भावविश्वातील आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा हा महत्त्वाचा घटक आहे. यंदा मुंबई विभागातील प्राथमिक फेरीत एकूण १७ महाविद्यालयांनी एकांकिका सादर केल्या. यात ‘डायनॉसॉर टू गांधी डास’ (वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय), ‘द एन्डलेस रनिंग’ (डॉ. आंबेडकर महाविद्यालय), ‘भग्न देवालय’ (सिद्धार्थ महाविद्यालय), ‘मेंदी’ (पाटकर महाविद्यालय), ‘पुन्हा व्हॅलेंटाइन डे’ (पीईएस विधि महाविद्यालय), ‘चक्र’ (वीरमाता जिजाबाई तंत्रनिकेतन), ‘पाझर’ (चेतना महाविद्यालय), ‘भोत’ (विद्यालंकार इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी), ‘सुरवंटाचा डीफ्रिगमेटेन्शन’ (इस्माइल युसूफ महाविद्यालय), ‘एक घे एक मुफ्त’ (शहा महाविद्यालय), इसाक आणि ती (मिठीबाई महाविद्यालय) आणि ‘शिंक’ (शैलेंद्र महाविद्यालय) आदी महाविद्यालयांचा समावेश आहे.
अनेक सामाजिक, आर्थिक, धार्मिक विषयांना विद्यार्थ्यांनी हात घातला होता. शेतकरी आणि कामगार यांच्या जमिनी हडपून विकास करणारे बांधकाम व्यावसायिक, यातून मिळणाऱ्या गडगंज पैशासाठी आई-वडिलांचा खून करणारी मुले, गावाकडून मुंबईत येऊन बायकांच्या हातावर मेंदी काढण्याचा व्यवसाय करणारा आणि तृतीयपंथी झालेला तरुण आणि हे आपल्या आईला समजल्यानंतर त्या दोघांचीही झालेली तडफड असे अनेक प्रश्न एकांकिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मांडले.
प्रेम म्हणजे नेमके काय, केवळ शारीरिक प्रेम हे खरे की नात्यातील विश्वास, नि:स्वार्थी प्रेम, मनाशी जोडलेले नाते म्हणजे खरे प्रेम याविषयी अंध व्यक्तीने डोळसांची केलेली कानउघाडणी, भ्रमणध्वनी आणि त्यातील ‘गेम्स’चा अतिरेक, यामुळे आजच्या तरुण पिढीचे बिघडलेले शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य, मेलेल्या जनावरांची विल्हेवाट लावण्याचे काम करणाऱ्या समाजाच्या व्यथा, वेदना आणि त्यांच्या जगण्याचे भेदक वास्तव, भविष्याचा विचार करताना वर्तमानाकडेही डोळसपणे कसे पाहायला हवे हे विद्यार्थ्यांनी नेमकेपणाने सांगितले.
आजच्या पिढीतील महिलांचे धर्म, रूढी, परंपरा, सामाजिक अटी बाजूला सारून व्यक्त होणे, त्यातून उद्भवणारी परिस्थिती, लहान मुलांच्या गोष्टीचा आधार घेऊन मोठा संदेश देण्याचा प्रयत्न, नात्यातील पेच वाढल्यानंतर त्या नात्यापासून स्वत:ला दूर ठेवून पाहिले तर अनेक प्रश्नांची होणारी उकल, सीमेवरील सैनिकाच्या आयुष्यातील घडणारे प्रसंग, हिंदू-मुस्लिमांमधील ताण-तणाव, साध्या शिंकेमुळे निर्माण होणारी परिस्थिती आणि त्याभोवती फिरणारी गोष्ट असे एकापेक्षा एक वैविध्यपूर्ण आणि खणखणीत विषय हाताळण्यात आले. यासह पात्रांच्या वाखाणण्यासारख्या हालचाली, संवादफेक, प्रयोगाची मांडणी, चाबूक अभिनय आणि प्रचंड ऊर्जा यांची जोड दिसून आली.
‘सॉफ्ट कॉर्नर’ प्रस्तुत आणि ‘पृथ्वी एडिफिस’ यांच्या सहकार्याने झालेल्या ‘लोकसत्ता लोकांकिका’ या स्पर्धेसाठी रेडिओ पार्टनर म्हणून ‘९३.५ रेड एफएम’चे आणि टेलिव्हिजन पार्टनर म्हणून ‘झी मराठी नक्षत्र’चे साहाय्य लाभले आहे. ही स्पर्धा ‘अस्तित्व’ या संस्थेच्या मदतीने राज्यभरातील आठ केंद्रांवर होत आहे. तसेच स्पर्धेतील प्रतिभावान कलाकारांची निवड करण्यासाठी ‘आयरिस प्रॉडक्शन’ हे टॅलेण्ट पार्टनर, तर ‘स्टडी सर्कल’ हे नॉलेज पार्टनर म्हणून सहभागी होणार आहेत. तर हेमंत लब्धे, गिरीश पतके, राजीव जोशी, अभिजित झुंजारराव यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच सुवर्णा मंत्री व रागिणी चुरी या ‘आयरिस प्रॉडक्शन’च्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित होत्या.

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
अनेक गोष्टी समजतात
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या पद्धतीच्या एकांकिका या स्पर्धेत सादर होतात. हा एक अत्यंत चांगला उपक्रम आहे. या स्पर्धेमुळे निरनिराळे विषय सादर होतात. त्यामुळे अनेक गोष्टी समजण्यास मदत होते.
– समीर गरुड, लेखक, रुईया महाविद्यालय
स्पर्धेत उतरताना धमाल
लोकांकिकात सादर होणाऱ्या एकांकिका एकापेक्षा एक असतात. यात आम्ही अंतिम फेरीत आलो याचा अभिमान आहे. महाराष्ट्रातून उत्तम एकांकिकाच पुढे येते. त्यामुळे स्पर्धेत उतरतानाही धमाल येते.
– भावेश सुर्ते, लेखक, म. ल. डहाणूकर

परीक्षकांची प्रतिक्रिया
उत्तम कलाविष्कार
विविध विषय हाताळले गेले. समाजातील बोथट रुढींवर प्रकाश टाकणाऱ्या, नव्या संस्कृतीवर भाष्य करणाऱ्या एकांकिका सादर झाल्या. यात अनेक कलाकारांनी आपल्या कलागुणांची चुणुक दाखवत उत्तम कलाविष्कार सादर केला.
– रागिणी चुरी, आयरिस प्रॉडक्शन

जीवतोड मेहनतीचे चीज
मुंबईतील मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘लोकसत्ता लोकांकिका’च्या अंतिम फेरीत निवड झाली, याचा अतिशय आनंद आहे. महिनाभर जीव तोडून केलेल्या मेहनतीचे चीज झाले असे वाटते आहे. अजून खूप मेहनत करायची आहे. या माध्यमातून इतके भव्य व्यासपीठ उपलब्ध होणे हे माझ्यासारख्या तरुण कलावंतासाठी अतिशय महत्त्वाचे आहे.
– संतोष माईणकर, दिग्दर्शक, कीर्ती महाविद्यालय

परीक्षकांच्या प्रतिक्रिया
विषयांच्या विविधतेत मागे
स्पर्धा चांगली झाली. या व्यासपीठाचा जास्तीत जास्त उपयोग करुन घ्यावा, वेगवेगळे विषय हाताळले जावेत. महाराष्ट्राच्या तुलनेत मुंबईतील विद्यार्थी विषयांच्या विविधतेत मागे पडतात, असे दिसते.
अभिजीत झुंजारराव
तालीम, मार्गदर्शन, वेळ यांची सांगड हवी
‘लोकांकिका’ स्पर्धेची लोकप्रियता नक्कीच वाढली असून स्पर्धेत सहभागी होणे मानाचे झाले आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता वाढविणे गरजेचे आहे. ही स्पर्धा म्हणजे एक उत्तम व्यासपीठ आहे. पण तालीम, मार्गदर्शन आणि वेळ यांची सांगड घालण्यात विद्यार्थी कुठे तरी कमी पडत आहेत, असे वाटते.  राजीव जोशी

मुंबईशी संबंधित विषय हवे
स्पर्धेत सहभागी होताना तयारी करण्याच्या दृष्टीने त्या त्या महाविद्यालयातील शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे असे वाटते. एकांकिकेतून आपण जो विषय मांडणार आहोत त्याचे विद्यार्थ्यांना प्राथमिक ज्ञान, माहिती असावी. दिग्दर्शकाने सारासार विचार करावा, विषयांची निवड करताना योग्य ते भान ठेवावे. मुंबईकरांच्या रोजच्या जगण्यातील आणि त्यांना सामोरे जावे लागणाऱ्या समस्यांशी संबंधित विषय असायला हवे होते असे वाटते. ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धा म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम व्यासपीठ आहे. त्यांनी स्पर्धेत उतरताना वेगवेगळे प्रयोग करून पाहणे अपेक्षित आहे.    – हेमंत लब्धे
‘ग्लॅमर’मध्ये अडकू नका
‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेचा उद्देश खूप चांगला आहे. परंतु विद्यार्थ्यांकडून केली जाणारी विषयांची निवड, एकांकिकेवर घेण्यात येणारी मेहनत व अभ्यास कमी दिसून येतो. एकांकिकेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘ग्लॅमर’मध्ये न अडकता निव्वळ कला सादर करण्याचा ध्यास ठेवावा.    – गिरीश पतके

First Published on October 6, 2015 7:46 am

Web Title: loksatta lokankika mumbai section
टॅग Loksatta Lokankika
Just Now!
X