देशाच्या अन्य सगळ्या राज्यांपेक्षा महाराष्ट्र अनेक क्षेत्रांत उजवा असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या सहा दशकांत या राज्याने अनेक बाबतीत आघाडी घेतली. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाचे फलित ठसठशीतपणे पुढे आले. उद्योगस्नेही राज्य म्हणून या राज्याने आपली ओळख दृढ के ली आणि वैचारिक क्षेत्रातील तर्क वादाने अन्यांना त्याची दखल घेणे भाग पडले. महाराष्ट्र राज्याच्या ६१ व्या वर्धापनदिनाचे निमित्त साधून ‘लोकसत्ता’च्या वतीने, महाराष्ट्राचे हे विविधांगी वेगळेपण उलगडून दाखवणाऱ्या ‘महाराष्ट्र गाथा’ या वेब व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३ ते १४ मे या काळात ही व्याख्यानमाला होईल.

संपत्ती निर्मिती करणारे एक महत्त्वाचे राज्य म्हणून या राज्याकडे पाहिले जाते. या राज्याचा आर्थिक इतिहास म्हणूनच नुसता कौतुकास्पद नाही, तर अनुकरणीयही आहे. गेली अनेक दशके  अर्थशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. प्रदीप आपटे यांच्या व्याख्यानाने या मालेचा प्रारंभ होईल. सोमवार दि. ३ मे रोजी होणाऱ्या या व्याख्यानाचा विषय ‘महाराष्ट्राचा आर्थिक इतिहास’ असा आहे. संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झालेली ही अखंड संत परंपरा हे मराठीपणाचे एक अतिशय देदीप्यमान संचित आहे. महाराष्ट्राची संत परंपरा या विषयावर संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्रा. सदानंद मोरे यांचे व्याख्यान दि. ५ मे रोजी होईल.

भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत एकेकाळी केंद्रस्थान असलेल्या महाराष्ट्राने देशाचे राजकीय नेतृत्व केले. वेगवेगळ्या राजकीय विचारांचे संगोपनही या भूमीत सातत्याने होत राहिले. राज्यशास्त्राचे प्रसिद्ध अभ्यासक आणि टीकाकार प्रा. सुहास पळशीकर ‘मराठी नेतृत्व: किती वेगळे, किती सरधोपट?’ या विषयावर आपले विचार दि. ७ मे रोजी मांडणार आहेत.

परस्परविरोधी विचारांना या राज्याने नेहमीच आदराचे स्थान दिले. त्यातून व्यक्त झालेला तर्कवाद हे महाराष्ट्राचे आणखी एक वेगळेपण. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर दि. १० मे रोजी होणाऱ्या वेब व्याख्यानात ‘महाराष्ट्राचा तर्कवाद’ हा विषय मांडणार आहेत.

कलांच्या क्षेत्रातही मराठीजनांनी आपले वेगळेपण सतत टिकवून ठेवले. भावगीत हा कलाप्रकार ही महाराष्ट्राची वेगळी खूण. येथील रसिक समाजाने भावगीताला आपल्या दैनंदिन जगण्याचाच भाग बनवून टाकले. या समृद्ध परंपरेविषयी प्रसिद्ध संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी दि. १२ मे रोजी सप्रयोग बोलणार आहेत.  भावगीताबरोबरच काव्यपरंपरा हेही मराठी भाषेचे वैभव. अनेक कवींनी मराठी जनांचे भावविश्व गेली अनेक शतके समृद्ध केले आहे.‘महाराष्ट्र गाथा’ या वेब व्याख्यानमालेचा शेवट  ‘महाराष्ट्राची काव्य परंपरा’ या विषयावरील व्याख्यानाने होणार आहे. ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे या विषयावर  दि. १४ मे रोजी बोलणार आहेत.

वैशिष्ट्य…

महाराष्ट्राचा आर्थिक इतिहास, संत परंपरा, राज्यातील राजकीय नेतृत्त्वाचा उहापोह, महाराष्ट्राचा तर्कवाद, सुगम संगीत आणि काव्य परंपरा आदी अनेक विषयांवर ‘महाराष्ट्र गाथा’ या व्याख्यानमालेतून चर्चा घडणार आहे. विद्यार्थी, अभ्यासक, विचारवंत आणि ज्ञानसंग्रहकांसाठी ही मोठी मेजवानी ठरेल.

प्रस्तुती :

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)

सहप्रायोजक :

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

आणि मे. बी. जी. चितळे डेअरी

पॉवर्ड बाय :

मांडके हिर्अंरग सव्र्हिसेस, पुणे</p>

ही व्याख्यानमाला सायंकाळी सहा वाजता होईल व त्यासाठी पुढील लिंकवर, ज्या सत्रामध्ये सहभागी व्हायचे आहे, त्यासाठी नावनोंदणी करावी लागणार आहे. http://tiny.cc/LS_Maharashtra_Gaatha