मुंबई विभागीय फेरी स्पर्धकांनी गाजवली;  रुईया महाविद्यालयाचा आदित्य जंगले महाअंतिम फेरीत

उत्स्फूर्तता, विचारांची सुस्पष्टता, मुद्देसूद मांडणी, खणखणीत वाणी, ठाम मते आणि श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेत शनिवारी ‘लोकसत्ता’ वक्ता दशसहस्र्ोषु स्पर्धेची मुंबई विभागीय अंतिम फेरी स्पर्धकांनी गाजवली. प्राथमिक फेरीचे आव्हान पार केलेल्या स्पर्धकांमध्ये झालेल्या लढतीत ‘रामनारायण रुईया महाविद्यालया’तील आदित्य जंगले या विद्यार्थ्यांने बाजी मारत महाअंतिम फेरीत प्रवेश केला.

‘लोकसत्ता वक्ता दशसहस्र्ोषु’ या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या मुंबई विभागीय अंतिम फेरीतील विजेत्यांना परीक्षकांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. रुईया महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या माजी प्रमुख प्रा. मीना गोखले, मुंबई विद्यापीठातील मराठी विभागाच्या माजी प्रमुख आणि समीक्षक प्रा. पुष्पा राजापुरे-तापस आणि मुंबई विद्यापीठातील नाटयशास्त्र विभागाचे माजी संचालक आणि नाटककार शफाअत खान यांनी स्पर्धकांचे परीक्षण केले. यावेळी ‘तन्वी हर्बल प्रॉडक्ट्स’च्या मेधा मेहेंदळे, ‘युनिक अ‍ॅकॅडमी’चे मंगेश खराटे हे स्पर्धेतील वक्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आवर्जून उपस्थित होते. या स्पर्धेचे निवेदन सौरभ नाईक याने केले. मुंबई विभागाच्या अंतिम फेरीसाठी भारत संघराज्य आहे का? कोलावरी ते शांताबाई, पुरस्कार वापसी, शेती की उद्योग, साहित्य संमेलनाने साधते काय? हे पाच विषय देण्यात आले होते. यंदा या स्पर्धेचे दुसरे वर्ष असून ‘जनता सहकारी बँक.लि’ आणि ‘तन्वी हर्बल प्रॉडक्ट्स’ हे स्पर्धेचे सहप्रायोजक आहेत. ‘सिंहगड इन्स्टिटयमूट’ , ‘मांडके हिअिरग सद्गव्हसेस’, ‘इंडियन ऑइल’, ‘इन्स्टिटयमूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट’ यांच्या स्पर्धेस सहकार्य लाभले असून ‘युनिक अ‍ॅकॅडमी’ व ‘स्टडी सर्कल’ या स्पर्धेचे नॉलेज पार्टनर आहेत.

स्पर्धकांमध्ये कमालीची सहजता

आपण ज्या कालखंडात जगतो  तो उत्तर आधुनिक कालखंड म्हणून ओळखला जातो. या काळात प्रस्थापित कलेच्या विरोधी, कोणत्याही नियमांच्या सक्तीला विरोध करत कला व साहित्याचा आविष्कार केला जात आहे. यात काही प्रमाणात सोपेपणा आहे, पण ते सुलभ नक्कीच नाही. सध्या वक्त्यांची परंपरा खंडित झाली आहे.   आता वक्त्यांची गरज आहे का असाही प्रश्न विचारता येऊ शकतो.  कारण विविध माध्यमांमुळे माहिती आणि बंधनांना धक्का देत दाबलेल्या गोष्टी बाहेर येत आहेत. या स्पर्धकांमध्ये कमालीची सहजता दिसून आली, जी आमच्या पिढीत नव्हती. उत्स्फूर्त गोष्टींना शिस्त नसते. परंतु खूप तालमीनंतर उत्स्फूर्ततेमध्येही शिस्त येऊ शकते. आपले मुद्दे मांडत असताना लोकांना आवडेल, रुचेल असे बोलण्याची आवश्यकता नाही. अभ्यासपूर्वक, सर्व बाबींचा विचार करून तो विषय पचवून मांडण्याची गरज आहे. अशा प्रगल्भपणे विचार मांडणाऱ्या वक्त्याची लोक वाट पाहत आहेत.

– शफाअत खान, परीक्षक.

अभ्यासपूर्ण बोलण्याची गरज

‘लोकसत्ता’ने विद्यार्थ्यांना त्यांची कौशल्ये सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळवून दिले यासाठी लोकसत्ताचे आभार. वादविवाद व वक्तृत्व  या दोन्ही स्पर्धामध्ये काही मूलभूत फरक आहेत. वादविवाद स्पर्धेमध्ये विषयाची एक बाजू मांडायची असते, परंतु, वक्तृत्व सादर करताना एका विषयाच्या विविध बाजूंचा विचार करत त्या स्पष्टपणे मांडायच्या असतात. वक्तृत्व सादर करताना त्या विषयाच्या प्रचलित गृहीतकावर आधारित बोलण्यापेक्षा पटते ते ठामपणे मांडावे. कोलावरी ते शांताबाई हा विषय अनेक विद्यार्थानी घेतला व विद्यार्थानी त्याला न्यायही दिला. बोलताना सहसंदर्भ बोलणे ही वक्तृत्वाची आणखी एक महत्त्वाची बाजू आहे. विषयाचा अभ्यास न करता व्यासपीठावर चढण्यासारखे पाप दुसरे नाही. विषय मांडताना अभ्यासपूर्ण बोलणे हे गरजेचे आहे. बोलण्याच्या ओघात आपली दोन वाक्ये परस्पर विरोधी ठरत नाहीत ना याचे भान ही वक्त्याकडे असायला हवे.

– पुष्पा राजापुरे-तापस, परीक्षक.

वक्त्याची शैली गवसण्यासाठी अभ्यासाची गरज

लोकसत्ताने ‘वक्ता दशसहस्त्रेषू’च्या माध्यमातून पुन्हा एकदा वक्तृत्व स्पर्धेला वलय प्राप्त करून दिले आहे. आठ विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या विभागीय अंतिम फेरीचा दर्जा चांगला होता. स्पर्धेत यश मिळवण्याची ईर्षां हवी, परंतु स्पर्धेची प्रक्रिया महत्त्वाची आहे. या प्रक्रियेतून आपणांस खूप काही शिकायला मिळत असते. विषय मांडताना कोणाचे अनुकरण करण्याची गरज नसते. उत्तम भाषा, बहुश्रूतपणा, अर्थसंगती या गुणांचा विकास करून वक्तृत्व घडवता येते. स्वाभाविक भाषा व मांडणीतील सहजता यांच्याद्वारे कोणत्याही विषयावर विचार मांडले गेले पाहिजेत. अवघड वाटणाऱ्या विषयांवर अभ्यास करून बोलायला हवे. त्याच्या विविध पैलूंचा अभ्यास करायला हवा. यातून विद्यार्थ्यांना स्वत:ची एक बाजू मते तयार होतील. त्यातूनच वक्त्याला स्वतंत्र शैली गवसत असते. या स्पर्धेमुळे तरुण मंडळींमध्ये जाण्याची, त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळाली.

-प्रा. मीना गोखले, परीक्षक.

विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया

प्राथमिक फेरीतून विभागीय अंतिम फेरीत प्रवेश केल्यावर पुन्हा नव्याने विषयाची तयारी करावी लागली. विभागीय अंतिम फेरीसाठी नवे विषय दिल्यामुळे या विषयांचा अभ्यास करता आला. त्यातून मी ‘शेती की उद्योग’ हा विषय निवडला. हा विषय सध्या आपल्या देशात महत्त्वाचा असून त्याच्यावर अभ्यास करण्याची व मते मांडण्याची संधी या स्पर्धेमुळे मिळाली. स्पर्धेचा हा दुसरा टप्पा असल्यामुळे विषय अधिक व्यापक अभ्यास करून मांडावा लागला.

यावेळी परीक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे कोणत्याही विषयाकडे कसे पाहावे, विचार कसा करावा याबद्दल नवा दृष्टिकोन मिळाला. आता महाअंतिम फेरीत संपूर्ण महाराष्ट्रातून निवडलेले विद्यार्थी वक्ते स्पर्धक असणार आहेत. त्यामुळे महाअंतिम फेरीसाठी कसून तयारी करावी लागणार आहे. परंतु, त्याआधी होणाऱ्या कार्यशाळेबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

– आदित्य जंगले, रामनारायण रुईया महाविद्यालय, प्रथम क्रमांक

द्वितीय क्रमांक मिळाल्याचा आनंद तर आहेच मात्र पुढच्या फेरीसाठी निवड होऊ  शकत नसल्याचे दु:खही आहे. मात्र स्पर्धेतून मिळालेला अनुभव समृद्ध करणारा आहे. ही स्पर्धा इतर वक्तृत्व स्पर्धासारखी नसून येथे चौकटीच्या पलीकडे विचार करावा लागला. कारण वक्तृत्व म्हणजे संदर्भासाठी काही पुस्तके वाचून किंवा गुगलवरून माहिती घेऊन सादर करणे असे नाही. येथे तुम्हाला या विषयांवर विचार करावा लागतो. या प्रक्रियेतून तुमचे स्वत:चे वेगळे मत तयार होते. कारण दिलेले विषय वेगळे असल्यामुळे कुठल्या पुस्तकातून त्याची माहिती मिळणे तसे कठीण.

– आदित्य कुलकर्णी, साठय़े महाविद्यालय, द्वितीय पारितोषिक

मी कोलावरी ते शांताबाई या विषयावर वक्तृत्व सादर केले होते. सुरुवातीला हा विषय ललित वाटला होता. मात्र विषयाचा अभ्यास केला, शिक्षकांशी बोलले तेव्हा या विषयाचा खोलवर विचार केला. त्यामुळे या विषयामधील उत्तर आधुनिकतावादाच्या अंगाने हा विषय मांडला. एकंदर या स्पर्धेच्या प्रक्रियेमध्ये खूप शिकायला मिळालं. पुढच्या फेरीत जाता आले नाही, पण तरीही अनुभव महत्त्वाचा होता.

– प्रिया तरडे, रुपारेल महाविद्यालय, तृतीय पारितोषिक