26 February 2021

News Flash

उपास नको, तर आहार संतुलित हवा

खाण्यापलीकडे इतर गोष्टींतील आनंद शोधायला हवा, असे मत शिल्पा जोशी यांनी व्यक्त केले.

‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’च्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात आहारतज्ज्ञ सुखदा भट्टे-परळकर, शिल्पा जोशी, ऐश्वर्या कुंभकोणी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.(छाया-दिलीप कागडा)

आहारतज्ज्ञांकडून कानमंत्र; ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चे प्रकाशन

मुंबई : डाएट म्हणजे काय यापासून ते कोणते पदार्थ कसे खावेत अशा चर्चेतल्या मुद्दय़ांचा ऊहापोह करताना योग्य आहारपद्धतीची ओळख करून देणाऱ्या लज्जतदार पाककृतींची ओळख ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’च्या प्रकाशनाच्या निमित्ताने गुरुवारी उपस्थितांना झाली. एखादा पदार्थ खाणे सोडून देणे, बेचव खाणे म्हणजे डाएटिंग ही चुकीची समजूत आहे. आहार, विहार आणि निद्रा यांचे संतुलन राखणे म्हणजे डाएट. आपल्या आहारात सर्व अन्नघटकांचा समप्रमाणात समावेश असणे गरजेचे आहे, असे मत आहारतज्ज्ञांनी या वेळी चर्चासत्रात व्यक्त केले.

‘स्वादिष्ट पण पौष्टिक’ आहारपद्धती सांगणाऱ्या ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’चे प्रकाशन अपना सहकारी बँक लिमिटेडचे दत्ताराम चाळके, केसरी टूर्सचे प्रमोद दळवी, बेडेकर मसालेचे मंदार बेडेकर, श्री धूतपापेश्वरचे के.ए. नायर आणि पितांबरी रुचियानाचे रजनीश अर्गेकर यांच्या हस्ते गुरुवारी झाले. अंक सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. त्यानंतर आहारतज्ज्ञ शिल्पा जोशी, ऐश्वर्या कुंभकोणी, सुखदा भट्टे-परळकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

आपला प्रत्येक समारंभ, आनंद हा आपण फक्त खाण्याशी जोडतो. त्यातून अनेकदा आपले आहारसंतुलन बिघडते. खाण्यापलीकडे इतर गोष्टींतील आनंद शोधायला हवा, असे मत शिल्पा जोशी यांनी व्यक्त केले.

आहार चौरस हवा. प्रथिने, कबरेदके, जीवनसत्त्वे देणाऱ्या पदार्थाचा योग्य प्रमाणात आहारात समावेश असावा. आपल्या आहारात बहुतेक वेळा कबरेदकांचे प्रमाण जास्त असते ते टाळायला हवे. कच्च्या भाज्या, शिजवलेल्या भाज्या, डाळी किंवा उसळी आहारात नियमित असाव्यात, असे सुखदा भट्ट यांनी सांगितले. ‘बेकरी पदार्थ आणि तळलेले पदार्थ टाळावेत. साखर खावी पण मर्यादित खावी. फळांच्या ज्यूसपेक्षाही फळे खाणे आणि शक्य ती फळे सालीसकट खावीत,’ असा कानमंत्र ऐश्वर्या कुंभकोणी यांनी दिला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 2:05 am

Web Title: loksatta purnabramha magazine released
Next Stories
1 मुंबई उपनगरातील वीज व्यवसाय  रिलायन्सकडून अदानींच्या ताब्यात
2 विनातिकीट प्रवासाबद्दल १००० रुपये दंड?
3 Vidhan Parishad Election: मुंबईत सेनेचे विलास पोतनीस, लोकभारतीचे कपिल पाटील गड राखण्यात यशस्वी
Just Now!
X