‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे नववे पर्व

सरत्या श्रावणसरींनी दुष्काळछाया विरळ होऊ लागली असली तरी आर्थिक आघाडीवर मंदीछाया गडद होऊ लागली आहे. पूरग्रस्त भागांतील जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले खरे; पण तेथील जनतेची समस्यांच्या पुराशी झुंज संपलेली नाही. मात्र, सारे चिंतेचे ढग दूर सारून अवघा महाराष्ट्र गणेशोत्सवासाठी सज्ज झाला आहे. राज्यभरात गणेशोत्सवाच्या या उत्सवी वातावरणात ‘सर्वकार्येषु सर्वदा’ हा अनोखा दानयज्ञ सोमवारी, गणेशचतुर्थीपासून सुरू होत आहे.

यंदा ‘सर्वकार्येषु सर्वदा’ उपक्रमाचे नववे पर्व. गणेशोत्सवाच्या मंगलपर्वात समाजात विधायक काम करणाऱ्या संस्थांची ओळख करून देणारा हा उपक्रम. कोणी वंचितांचा आधारवड बनलेली, कोणी साहित्य-संस्कृतीत अमूल्य योगदान देणारी, कोणी शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रांत निरपेक्ष भावनेने काम करत पाय घट्ट रोवून उभी राहिलेली, तर कोणी अनाथ, जखमी प्राण्यांचा सांभाळ करण्यासाठी सरसावलेली. या सर्वच संस्था विविध क्षेत्रांतील उणिवा हेरून त्या दूर करण्यासाठी उभ्या राहिलेल्या. आर्थिक अडचणीचा सामना करूनही आपले काम नेटाने करणाऱ्या या संस्था. विधायक कार्याचा वसा घेऊन काम करणाऱ्या या संस्थांना मदतीचे पाठबळ देणे हे आपल्या सर्वाचे काम. गेल्या आठ वर्षांत दानशूरांनी ते चोखपणे बजावले. त्यात ‘लोकसत्ता’ची भूमिका केवळ माध्यम म्हणूनच.

या उपक्रमाद्वारे विविध क्षेत्रांतील सामाजिक संस्थांची विधायक साखळी ‘लोकसत्ता’ने तयार केली आहे. गेल्या आठ वर्षांत वेगवेगळ्या क्षेत्रांतील ८२ संस्थांना या उपक्रमाद्वारे बळ मिळाले. यंदाही गणेशोत्सवकाळात राज्यातील दहा संस्थांची ओळख या उपक्रमाद्वारे करून देण्यात येणार आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमातील या संस्थांच्या कार्याला लाखो दानशूर पाठबळ देतील, याची खात्री आहे.

उद्यापासून दररोज एका संस्थेची माहिती आणि देणग्यांसाठी आवश्यक असलेला इतर तपशील ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल. बुद्धिदात्या गणरायाच्या उत्सवकाळात एक अनोखा दानयज्ञ सुरू राहील. गणेशोत्सवाच्या सर्वाना मन:पूर्वक शुभेच्छा!