संजय बापट

‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे कोकणाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. वादळात झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून कोकणाचे तब्बल सहा हजार कोटींचे नुकसान झाले आहे. यात सर्वाधिक फटका वीजपुरवठा आणि फळबागांना बसला आहे. चक्रीवादळग्रस्तांना वाढीव मदत देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच घेतला असून त्यानुसार केंद्र सरकारकडे राष्ट्रीय आपत्ती निधीतून  ११०० कोटी रुपयांच्या मदतीची मागणी करण्यात येणार आहे.

निसर्ग चक्रीवादळाचा कोकणाला, त्यातही रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्य़ाला सर्वाधिक फटका बसला असून त्यात घरांचे, फळबागांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. राज्य सरकारसोबतच केंद्रीय पथकाने या भागातील नुकसानाची पाहणी केली.

वादळामुळे रायगड जिल्ह्य़ात १७०० घरे पूर्णत: बाधित झाली असून सुमारे एक लाख ९० हजार घरांचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. तर ४८ हजार शेतकऱ्यांच्या १६ हजार हेक्टर शेतीचे नुकसान  झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातही ३२ हजार शेतकऱ्यांचे आठ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्य़ात १४०० घरे पूर्णत: उद्ध्वस्त झाली असून ४४ हजार घरांचे कमीअधिक प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. या वादळामुळे महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेचे सुमारे १५० कोटींचे नुकसान झाल्याचे कळते.

लवकरच केंद्राला प्रस्ताव..

* चक्रीवादळात सहा हजार ५० कोटीचे एकूण नुकसान झाल्याचा आराखडा तयार करण्यात आला असून केंद्र सरकराच्या राष्ट्रीय आपत्ती मदत निकषाप्रमाणे सरकारला जेमतेम ३६० ते ३७० कोटींपर्यंतच मदत मिळण्याची शक्यता आहे.

* मात्र फळबागांचे मोठय़ाप्रमाणात नुकसान झाले असून या बागा नव्याने उभ्या करणेही अवघड आहे, त्यामुळे विशेष बाब म्हणून या भागासाठी किमान ११०० कोटींची मदत मागण्याची तयारी राज्य सरकारने केली असून त्याबाबतचा प्रस्ताव लवकरच केंद्राला पाठविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

* आपद्ग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीत कोकणसाठी वाढ करण्याचा निर्णय सरकारने काही दिवसांपूर्वीच घेतला असून त्यानुसार चक्रीवादळात घरांचे पूर्णपणे नुकसान झालेल्यांना

दीड लाख रुपयांची तसेच फळबागांकरिता हेक्टरी ५० हजार तर कपडे आणि भांडी खरेदीसाठी १० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्यानुसार आतापर्यंत ५०० कोटी रुपये मदत वाटपासाठी जिल्हा प्रशासनांना देण्यात आले आहेत.